
देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्यावतीने १५ गुरे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम सेवा संस्थानच्या गोशाळेत सुपूर्द करण्यात आले. यामध्ये आठ बैल आणि सात गायींचा समावेश आहे. या गोवंशांच्या संगोपनाची जबाबदारी गोशाळेने स्वीकारली असल्याची माहिती नगरपंचायतीचे स्वच्छता सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी दिली.
गोशाळेत दाखल करण्यात आलेल्या गोवंशांना चारा, पाणी, निवारा तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या देखभालीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच स्वच्छता सभापती बुवा तारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे कर्मचारी संदीप कोरगावकर, गुरुप्रसाद अदम, राजेंद्र दळवी आणि मुकादम बिंबवणेकर यांनीही महत्त्वपूर्ण प्रयत्न केले.
गोवंशांच्या संगोपनासाठी सहकार्य केल्याबद्दल नगरपंचायतीच्या वतीने खेड येथील गोशाळा व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे १५ मोकाट गुरांचा निवारा आणि संगोपनाचा प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








