
सिंधुदुर्गनगरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कार्यकाळाला ७ जून रोजी १२ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे "मोदी सरकारची १२ वर्षे - विश्वास, विकास आणि जनकल्याणाची" हे विशेष अभियान जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जनसंपर्क मोहीम, जनकल्याण शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, नैसर्गिक शेती कार्यशाळा आणि योग शिबिरांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मोदी सरकारची १२ वर्षे - विश्वास, विकास आणि जनकल्याणाची" हे विशेष अभियान संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सरचिटणीस रणजीत देसाई, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर आदी उपस्थित होते.
८ ते १४ जून या कालावधीत खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सरचिटणीस तथा समिती संयोजक आमदार निरंजन डावखरे आणि आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सुमारे एक हजार मान्यवर व्यक्तींच्या भेटी घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली जाणार आहे. तसेच मोदी सरकारच्या वाटचालीत सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता भेटही प्रदान करण्यात येणार आहे.
१२ ते २० जून दरम्यान प्रत्येक तालुक्यात जनकल्याण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांची नोंदणीही या शिबिरांमध्ये केली जाणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावर प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, साहित्यिक आणि बुद्धिजीवी वर्गाच्या संवाद संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रत्येक मंडळात मोदी सरकारच्या विविध उपलब्धींचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून चित्रकला स्पर्धा, लाभार्थ्यांचे अनुभव कथन तसेच विविध योजनांसाठी नोंदणी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मंडळात नैसर्गिक शेती कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
३० हजार झाडांचे वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी "एक झाड आईच्या नावाने" या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९२१ बूथवर प्रत्येकी ३० झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामधून सुमारे ३० हजार झाडांचे वृक्षारोपण होणार असून त्यांची वर्षभर देखभाल करण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. जांभूळ, आवळा, कोकम, फणस आदी फळझाडांच्या रोपांची व्यवस्था करण्यात आली आहे.
किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी जिल्ह्यातील गड, कोट, किल्ले आणि ऐतिहासिक वारसा स्थळांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुमारे २० ठिकाणी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
योग दिन व आणीबाणी स्मरण
२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रत्येक मंडळात योग शिबिरे आयोजित करण्यात येणार असून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे महत्त्व सांगितले जाणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांनाही योग शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या स्मरणार्थ हा दिवस "काळा दिवस" म्हणून पाळण्यात येणार आहे. आणीबाणीच्या काळातील सहभागी व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार असून या विषयावर मंडळस्तरावर व्याख्यानांचे आयोजनही करण्यात येणार आहे.











