LIVE UPDATES

कणकवलीत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त '10 किमी रन 2026' स्पर्धेचे आयोजन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 29, 2026 18:34 PM
views 20  views

कणकवली : स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग, कणकवली तालुका पत्रकार संघ आणि शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 'कणकवली 10 किलोमीटर रन 2026' या भव्य धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन रविवार, 30 ऑगस्ट 2026 रोजी 7 वाजता करण्यात आले आहे. कणकवली कॉलेज मैदान येथे होणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष असून जिल्ह्यातील धावपटूंसाठी ही स्पर्धा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया 15 जुलै 2026 पासून सुरू झाली असून विविध वयोगटांतील मुला-मुली तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले आहेत. 12 वर्षांखालील गटासाठी 2 किमी, 14 व 17 वर्षांखालील गटासाठी 3 किमी, 19 वर्षांखालील गटासाठी 5 किमी, तर खुल्या गटासाठी 5 किमी आणि 10 किमी अंतराची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

वयोगटानुसार स्पर्धेची प्रवेश फी  12 वर्षा आतील मुले व मुली (2 किमी) रुपये 275, 14,17 वर्षा आतील मुले व मुली (3 किमी) रुपये 275, 19 वर्षा आतील मुले व मुली व खुला गट महिला व पुरुष  (5 किमी) रुपये 375 , आणि  खुला गट महिला व पुरुष (10 किमी) रुपये 425 अशी निश्चित करण्यात आली आहे. सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल, सहभाग प्रमाणपत्र आणि नाश्ता देण्यात येणार असून प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष बयाजी बुराण,तसेच क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष बाळकृष्ण कदम आणि सहसचिव तेजस बागगीणकर यांनी केले आहे.