
दोडामार्ग : ग्रामविकास म्हणजे केवळ इमारती उभारणे नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया असते, हे प्रत्यक्षात दाखवून देणारी आयनोडे–हेवाळे ग्रामपंचायत आज संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातही ग्रामविकासाचा आदर्श ठरत आहे. माजी सरपंच संदीप देसाई यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेला हा विकासप्रवास विद्यमान सरपंच साक्षी देसाई यांच्या नेतृत्वाखाली अधिक भक्कम आणि व्यापक होत असून, नूतन प्रशासकीय इमारत व दोडामार्ग तालुक्यातील पहिले महिला भवन उभारून ग्रामपंचायतीने सामाजिक विकासाचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
आयनोडे–हेवाळे ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारत व महिला भवनाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी मनीष दळवी यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या लोकार्पण सोहळ्यास जिल्हा बँक संचालक तथा भाजप सरचिटणीस महेश सारंग, जि. प. चे माजी उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा-शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, माजी सरपंच संदीप देसाई, शिवसेना तालुका संघटक गोपाळ गवस, मोरगाव सरपंच संतोष आईर, सरपंच देवेंद्र शेटकर, आकांशा शेटकर, रामदास मेस्त्री, प्रवीण गवस, भगवान गवस, गावच्या सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच वैशाली गवस, ग्रा.पं.सदस्य समीर देसाई, जानवी खानोलकर, रुपेश कदम, पोलीस पाटील स्मृती देसाई यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. दळवी म्हणाले की, हेवाळे ग्रामपंचायतीने राबविलेली नियोजनबद्ध, दर्जेदार आणि लोकाभिमुख विकासकामे इतर गावांसाठी दिशादर्शक ठरत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला भवनाचा मोठा उपयोग होणार असून, महिलांनी गावातील स्थानिक उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारून स्वावलंबी व्हावे, त्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी मनीष दळवी यांनी दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वन्यप्राण्यांच्या उपद्रवाच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. हेवाळे परिसरात हत्तींचा उपद्रव वाढत असून शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हत्ती पकड मोहीम प्रस्तावित करण्यात आली होती; मात्र प्राणीमित्रांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे ही मोहीम रखडली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी आयुष्यभराच्या कष्टाने उभी केलेली बागायती उद्ध्वस्त होत असताना त्यांचे दुःख समजून घेणारे कोणी नाही, असे सांगत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हेवाळे गावच्या विकासासाठी आपले सहकार्य नेहमीच राहील, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा भाजप सरचिटणीस महेश सारंग यांनी दोडामार्ग तालुक्याने नेहमीच महायुतीला भक्कम पाठिंबा दिल्याचे सांगत, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती व गावच्या निवडणुकांमध्येही हीच एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच सौ. साक्षी देसाई यांनी प्रास्ताविक करत ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हा विकास शक्य झाल्याचे सांगितले.
तर माजी सरपंच संदीप देसाई यांनी आपण सुरू केलेले ग्रामविकासाचे कार्य नवी टीम त्याच पाऊलावर पाऊल ठेवत पुढे नेत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आपल्या कार्यकाळात सुरू झालेल्या प्रशासकीय इमारतीत महिला भवन उभारण्याच्या संकल्पनेबद्दल त्यांनी विद्यमान सरपंचांचे अभिनंदन केले.
यावेळी माजी सरपंच संदीप देसाई, राजाराम देसाई, इमारतीसाठी विना मोबदला जागा देणारे सयाजी देसाई, अनंत देसाई, तानाजी देसाई, सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच वैशाली गवस, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, सीआरपी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामविकास अधिकारी संदीप पाटील, तिन्ही गावांतील पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत गवस यांनी केले.
संदीप देसाई यांचं मनीष दळवी यांनी केलं खास कौतुक
आयनोडे–हेवाळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप देसाई यांनी केलेले ग्रामविकासाचे कार्य अतुलनीय असून त्यांनी गावाचं नाव थेट राज्यपातळीवर नेलं आहे. जिल्हा मुख्यालयापासून टोकावर असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील या गावात शासनाच्या विविध योजना, अभियान व उपक्रम प्रभावीपणे राबवून त्यांनी अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून दिले. त्यामुळे आज हेवाळे गाव ग्रामविकासात आदर्श म्हणून ओळखले जाते. त्यांनी घालून दिलेल्या विकासाच्या वाटेवर विद्यमान सरपंच साक्षी देसाई व त्यांचे सहकारी आत्मविश्वासाने पुढे चालत असल्याचे सांगत श्री. दळवी व उपस्थित मान्यवर यांनी कौतुक केलं.
हेवाळेच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध…
हेवाळे गावच्या अत्यंत महत्त्वाच्या पुलाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर, माजी सरपंच संदीप देसाई यांनी मांडलेल्या चव्हाटा मंदिर व राम मंदिर परिसराचा विकास, तसेच हेवाळे–बाबरवाडी दोन्ही रस्त्यांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश करून सुसज्जीकरण करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून ठोस कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही मनीष दळवी यांनी दिली.
साक्षी देसाई यांचं महिलांसाठी उल्लेखनीय कार्य
महिला सरपंच म्हणून काम करताना साक्षी देसाई यांनी हेवाळे गावात दोडामार्ग तालुक्यातील पहिले महिला भवन उभारून महिलांसाठी सशक्त व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले. हा उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.













