डिजिटल अरेस्ट गुन्ह्यातील आरोपी सिंधुदुर्ग सायबर पोलिसांच्या ताब्यात

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 24, 2025 19:50 PM
views 143  views

सिंधुदुर्गनगरी : डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत सिंधुदुर्ग सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक रक्कम जप्त करण्यात आली आहे. कणकवली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३२३/२०२५ अन्वये माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली तपास सुरू असताना, सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला.


तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धार्थ कुमार जवाहरलाल गुप्ता (वय ३३, रा. उत्तर प्रदेश) याने डिजिटल अरेस्टची भीती दाखवून संबंधित नागरिकाची आर्थिक फसवणूक केली होती. सखोल तपासानंतर आरोपीस उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोळे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


डिजिटल गुन्ह्यांविरोधात सिंधुदुर्ग सायबर पोलीस सतर्क असून नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद फोन, व्हिडीओ कॉल अथवा आर्थिक मागणीला बळी न पडता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.