LIVE UPDATES

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘स्टार्टअप वर्कशॉप’

महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे सीईओ डॉ. श्रीकांत पाटील यांची उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 17:17 PM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअपच्या माध्यमातून प्रत्यक्ष व्यावसायिक रूप देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील इनक्युबेशन सेंटर आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्टअप वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना व प्रकल्पांची माहिती घेत त्यांना स्टार्टअपच्या दृष्टीने आवश्यक ते मार्गदर्शन पाटील यांनी केले. 

त्यांच्यासोबत उपस्थित असलेले केआयटी इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनचे सीईओ सुधीर अरळी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कॉलेजच्या इनक्युबेशन सेलच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती मिलिंद देसाई यांनी दिली. विद्यार्थ्यांनी स्वतः विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे व कल्पनांचे सादरीकरण केले. त्यावर उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना आवश्यक सुधारणा, बाजारपेठेची गरज आणि उत्पादनाची व्यवहार्यता याबाबत सूचना केल्या.

कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रतिष्ठान, माणगावचे अध्यक्ष सुनील उकीडवे, केआयटी इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनचे संदीप लाड, संस्थेचे सीईओ ले.कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, प्राचार्य डॉ.रमण बाणे, फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन टीपीओ हेड मिलिंद देसाई, टीपीओ महेश पाटील, केशव मणेरीकर आणि आशिष सुवारे यांनी केले.