LIVE UPDATES

कुडाळ शहराचा ‘प्रारूप विकास आराखडा’ जाहीर

हरकतींसाठी ८ जुलैपर्यंत मुदत
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 18, 2026 12:29 PM
views 84  views

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर - शिरवलकर यांचा पुढाकार 

कुडाळ : कुडाळ शहराच्या पुढील २० वर्षांतील सर्वांगीण आणि नियोजित विकासाची दिशा ठरवणारा 'कुडाळ नगरपंचायत प्रारूप जमीन वापर आराखडा (२०२१-२०४१)' अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम २६(१) अन्वये हा आराखडा जाहीर झाला असून, यावर नागरिकांना आपल्या हरकती व सूचना नोंदवण्यासाठी ८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

नागरिकांना या आराखड्याची आणि स्वतःच्या प्रभागाची माहिती सहज मिळावी यासाठी नगराध्यक्षा प्राजक्ता आनंद शिरवलकर-बांदेकर यांच्या माध्यमातून शहरातील सर्व १७ वॉर्डांमध्ये सर्व्हे नंबरसह नकाशे असलेले भव्य माहिती बॅनर्स लावण्यात आले आहेत.

शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संपूर्ण नगरपंचायत क्षेत्राचे वेगवेगळ्या विभागांत (झोन) वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये खालील प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. पिवळ्या रंगाने दर्शवलेले नागरिक वस्तीसाठीचे क्षेत्र आहे. व्यापारी व व्यावसायिक उपयोगाचे क्षेत्र आहे. उद्योगांसाठी राखीव जागा आहे.

शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक सोयी-सुविधा आहे. उद्यान, बगीचे आणि खेळाची मैदाने यासाठी राखीव जागा आहे.  शेती आणि हरित पट्टा म्हणून राखलेले क्षेत्र आहे. या झोनिंगमुळे किंवा निश्चित केलेल्या आरक्षणांमुळे जर कोणत्याही शहरवासीयाला अथवा जमीन मालकाला काही अडचण किंवा त्रास होत असेल, तर त्यांनी मुदतीपूर्वी आपली हरकत नोंदवणे आवश्यक आहे.

नकाशात भौगोलिक व पर्यावरणपूरक बाबींचाही विचार करण्यात आला आहे. भंगसाळ नदीच्या पात्राजवळ 'ब्लू फ्लड लाईन' (निळी पूर रेषा) आणि 'रेड फ्लड लाईन' (लाल पूर रेषा) दर्शवण्यात आल्या आहेत. या पूर रेषेच्या आत येणाऱ्या क्षेत्रात बांधकाम व विकासावर पाटबंधारे विभागाच्या नियमांनुसार निर्बंध राहतील. याशिवाय नकाशात गावची हद्द, रेल्वे लाईन, हाय टेन्शन वीज वाहिनी आणि नदी-नाले स्पष्टपणे सर्व्हे नंबरसह अंकित केले आहेत.

याबाबत बोलताना नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर म्हणाल्या, "हा आराखडा कुडाळच्या विकासाचा पाया आहे. शहराचा विकास करताना जनतेचे हित आणि हक्क अबाधित राहिले पाहिजेत. म्हणूनच प्रत्येक नागरिकाला आपल्या प्रभागातील जमिनीचा सद्यस्थितीतील स्टेटस कळावा यासाठी आम्ही सर्व प्रभागांत हे बॅनर्स लावले आहेत. नागरिकांनी याचा सखोल अभ्यास करून ८ जुलैपूर्वी आपल्या हरकती नगरपंचायतीकडे सादर कराव्यात."

कुडाळ नगरपंचायत कार्यालय

कुडाळकरांनी आपल्या हक्काच्या जमिनीच्या संरक्षणासाठी आणि शहराच्या चांगल्या नियोजनासाठी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा यांनी केले आहे.