
सिंधुदुर्गनगरी : संपूर्ण राज्यात एकाचवेळी पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पोलीस दलात रिक्त असलेल्या पोलीस शिपाईपदाच्या ७८ जागांसाठी आणि चालक पोलीस शिपाईपदाच्या नऊ अशा एकूण ८७ पदांसाठी पोलीस भरती करण्यात येत आहे. याबाबतची ऑनलाईन जाहिरात सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्य सरकारने राज्यातील पोलीस दलातील रिक्त असलेल्या पदांसाठी भरती राबविणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर आता संपूर्ण राज्यात एकाचवेळी भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक जिल्हयात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्गातही पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाईपदाच्या एकूण ८७ रिक्त पदांवर भरती होणार आहे.
७८ पोलीस शिपाईपदासाठी भरती
सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन २०२४-२५ मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त होणारी ७८ पदे भरण्यासाठी पोलीस शिपाईपदाची भरती आयोजित करण्यात आली आहे. या एकूण ७८ पदांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी २३ जागा, एसईबीसी प्रवर्गासाठी ८. ईडब्ल्यूएस साठी १२, इतर मागास प्रवर्गसाठी ११, विशेष मागास प्रवर्गासाठी ३, भटक्या जमाती ब साठी १. भटक्या जमाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ६ तर वि.जा.अ. ड साठी ३, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ९, साठी २ जागा आरक्षित आहेत. तसेच या विविध प्रवर्गासाठी जागा आरक्षित करताना त्यामध्ये महिला, खेळाडू प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य, गृहरक्षक दल यांच्यासाठीही त्यामध्ये आरक्षण
राहणार आहे. नऊ पोलीस शिपाई चालकपदासाठी भरती सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या आस्थापनेवर २०२४-२५ मध्ये पोलीस शिपाई चालक संवर्गातील रिक्त होणारी नऊ पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या एकूण नऊ जागांमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २ जागा, भटक्या जमाती क प्रवर्गासाठी १, भटक्या जमाती ड १, तर इतर मागास प्रवर्गासाठी २ जागा, ई.डब्ल्यू.एस. साठी २ आणि एस.ई.बी.सी. साठी एक जागा आरक्षित करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाईपदाच्या ८७ जागांसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली असून ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती policerecruitment2025.mahait. org आणि www.mahapolice. gov.in या sindhudurgpolice.co.in संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळांवर जाऊन माहिती घ्यावी व अर्ज करावा. काही अडचण भासल्यास ०२३६२ २२८२१४ व २२८२१६ या नंबरवर संपर्क साथावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत असून ती संपल्यानंतर भरतीसाठीची अर्ज तपासणी, त्यानंतर मैदानी चाचण्या व इतर प्रक्रिया राबविली जाणार आहे
 
 
    
                    
   


 
 
      
   
   
  
 
  
  
  
  
  	
   
   



 
 
               









 
       
       
       
       
      