
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवामुक्तीमुळे रिक्त झालेल्या ४३ लिपिक पदांच्या भरतीसाठी सहकार खात्याकडून मान्यता मिळाली असून, सरळ सेवा भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया आयबीपीएस संस्थेमार्फत पार पडणार असून, अर्ज करण्याची सुविधा दि. ५ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत उपलब्ध राहणार असून, जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यावाच आव्हान जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक दिलीपराव राणे, गजानन गावडे, प्रज्ञा ढवण , नीता राणे,रवींद्र मडगावकर, गणपत देसाई, प्रकाश मोरये, समीर सावंत, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले की,भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संगणकीय ज्ञानाबरोबरच बँकिंग क्षेत्रातील आवश्यक पात्रता असणे अपेक्षित आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरताना जिल्ह्याचा अधिवास दाखला (Domicile Certificate) अपलोड करणे बंधनकारक आहे. वयोमर्यादा किमान २१ वर्षे व कमाल ३८ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनमान्य सवलत मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार असून, परीक्षा केंद्रे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे असणार आहेत. परीक्षेनंतर निकाल ७ ते १० दिवसांत जाहीर होणार असून, गुणपत्रक डाउनलोड करता येईल.
अधिकृत माहिती व अर्ज करण्यासाठी बँकेच्या संकेतस्थळाला www.sindhudurgdcc.com भेट द्यावी.असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.