दोन महिन्यांच्या तान्हुल्याला मिळाले 'हृदय संजीवनी'

आरोग्य विभागाच्या तत्परता
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 19, 2026 16:23 PM
views 297  views

कुडाळ : जन्मतःच हृदयात छिद्र असलेल्या सरंबळ येथील दोन महिन्यांच्या ऋत्विक मनोहर जाधव या बालकावर 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा'अंतर्गत मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आरोग्य विभागाच्या तातडीच्या हालचाली आणि शासकीय योजनेच्या पाठबळामुळे या चिमुरड्याला नवे आयुष्य मिळाले असून, खासगी रुग्णालयात दीड ते दोन लाख रुपये खर्च येणारे हे ऑपरेशन पूर्णपणे मोफत पार पडले.

धावून आले मदतीचे हात

सरंबळ (ता. कुडाळ) येथील ऋत्विकला श्वासाचा त्रास होऊ लागल्याने पालकांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यावेळी तपासणीनंतर त्याच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. अशा कठीण प्रसंगी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील डॉ. मुक्ता दुधगावकर, डॉ. श्रेयस परब, परिचारिका विनया नार्वेकर आणि औषध निर्माता विवेक आंगणे यांनी तत्परता दाखवली. डॉ. प्रशांत बोभाटे यांच्या मदतीने 2D ECHO रिपोर्ट समजून घेत तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज पालकांना पटवून दिली आणि त्यांना धीर दिला.

शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता ऋत्विकचे मामा नितीन जाधव यांनी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी खर्चाच्या मंजुरीचे पत्र तातडीने उपलब्ध करून दिले, तर जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक राजेश पारधी यांनी जिल्हा स्तरावरील सर्व फॉलोअप पूर्ण केले.

यशस्वी शस्त्रक्रिया आणि आनंद

१० जानेवारी रोजी मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रशांत बोभाटे यांनी ऋत्विकवर यशस्वी ओपन हार्ट सर्जरी केली. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती आता उत्तम असून, जाधव कुटुंब आपल्या गावी सुखरूप परतले आहे. मोफत उपचार मिळाल्याबद्दल पालकांनी आरोग्य विभागाचे व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे मनापासून आभार मानले आहेत. कुडाळ तालुक्यातील दोन पथकांनी आतापर्यंत ९५ यशस्वी शस्त्रक्रिया आणि ७ हृदयरोग शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. ० ते १८ वयोगटातील बालकांना आरोग्याची कोणतीही समस्या असल्यास कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाळके व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.