
वेंगुर्ला : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान तथा कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव विरेंद्र सिंह यांनी २३ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेस भेट देऊन शहरात नगरपरिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण विकासकामांची पाहणी केली.
या दौऱ्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी, तहसीलदार, वेंगुर्ला तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी तसेच नगरसेवक यावेळी उपस्थित होते. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
सदर भेटीदरम्यान पालक सचिव यांनी नगरपरिषदेने नव्याने विकसित केलेल्या नमो उद्यानाची पाहणी केली. उद्यानामध्ये साकारण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण सुविधांची व वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी नगरपरिषद कार्यालयास भेट देऊन नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद शालेय कौशल्य विकास लॅबला भेट दिली. यावेळी त्यांनी रोबोटिक्स लॅबची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक कौशल्यविकास सुविधांची माहिती घेतली. लगतच्या अभ्यासिकेमध्ये आयोजित बैठकीत नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या विविध नाविन्यपूर्ण विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
नगरपरिषदेच्या प्रस्तावित डिजिटायझेशन प्रकल्पाबाबत पालक सचिव यांनी सविस्तर माहिती घेतली. या प्रकल्पाचे सादरीकरण मुंबई येथे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
वेंगुर्ला शहरातील सांडपाण्याच्या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी नगरपरिषद प्रशासनास दिल्या. तसेच दुष्काळ व पाणीटंचाईच्या अनुषंगाने चर्चा करताना नगरपरिषद क्षेत्रातील नैसर्गिक जलस्रोतांची माहिती जाणून घेतली व उपलब्ध जलस्रोतांच्या योग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने आढावा घेतला.
यानंतर पालक सचिव यांनी नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांची पाहणी करून विभागनिहाय कामकाजाची माहिती घेतली. स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरपरिषदेने केलेल्या कामांचा संदर्भ घेत, यापुढेही विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून वेंगुर्ला नगरपरिषद राज्यात एक आदर्श नगरपालिका म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीदरम्यान नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक व नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती मान्यवरांना दिली.









