वेंगुर्ले : आजकालच्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच जीवनशैलीमुळे अनेक आजार होत आहेत. लोक भरपूर पिझ्झा, चिझ, बर्गरसारखं फास्टफूड, मैद्याचे पदार्थ खात आहेत त्यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढत आहे. तसंच लोक आजकाल भाज्या, फळं कमी खातात याचाही शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर वेळीच यावर घालण्याचे आवाहन मुळव्याध शल्यचिकित्सक डॉ. अनिकेत वजराटकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.
मेडिकल असोसिएशन तर्फे येथील साई डिलक्स सभागृह, वेंगुर्ले येथे आयोजित डॉक्टरांच्या कार्यशाळेत डॉ. वजराटकर यांनी मार्गदर्शन करताना केले. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे, सचिव डॉ. संजीव लिंगवत, डॉ. प्रल्हाद मणचेकर, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी चे शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग वजराटकर, मोना वजराटकर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ वजराटकर म्हणाले की, खाण्यात चायनीज पदार्थाचा वाढता वापर, बेकरी प्रोडक्ट जास्त खाणे, वरचेवर अतिसार होणं, वजन वाढलेलं असणं, आहारात तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स कमी असणं, पाणी कमी पिणं, व्यायाम करताना अतिशय जड वजनं उचलणं यामुळे गुदद्वाराजवळील भागावर ताण येतो. शौचाच्यावेळेस या वाहिन्यांवर वाजवीपेक्षा जास्त ताण येणं त्यामुळे बराच काळ शौचालयात बसणं, बद्धकोष्ठता वाढते व मुळव्याध तयार होतो. यामुळे आपल्या सवयी वेळीच बदलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सौरभ पाटील यांनी वाढत्या संधीवात व गुडघ्याच्या तक्रारी बाबतीत मार्गदर्शन करून वयानुरूप गुडघ्यांची काळजी कशी घ्यावी हे सांगुन चालणं हा उत्तम व्यायाम असल्याचे सांगितले. कार्यशाळेत आयोजित प्रश्न मंजुषा कार्यक्रमात डॉ. अनिकेत वजराटकर व डॉ. सौरभ पाटील यांनी समर्पक उत्तरे दिली. मान्यवरांचे स्वागत डॉ. उबाळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.
यावेळी डॉ. ज्ञानेश्वर शिवचरण, डॉ. डि. पी. गोसावी, डॉ. किरण नाबर, डॉ. प्रसाद साळगांवकर, डॉ. नामदेव मोरे, डॉ. वसुधा मोरे, डॉ. सुबोध माधव, डॉ. संजय रावळ, डॉ. सुप्रिया रावळ, डॉ. महेंद्र सावंत, डॉ. जाई पेडणेकर, डॉ. अश्विनी सामंत, डॉ. प्रदीप शेटकर, डॉ. वंदन वेंगुर्लेकर, डॉ. अभिजित वणकुद्रे, डॉ. सुदीश सावंत, डॉ. सोनाली सावंत, डॉ सुरेखा काळे, डॉ. मिलिंद काळे, डॉ.के. जी. केळकर, डॉ. मनोज आरोसकर, डॉ. सतिश पाटील, डॉ. रायाजी सातोसकर, डॉ. अमरेश होडावडेकर, डॉ. दत्ता पवार, डॉ.प्रभु, डॉ. प्रणाली सावंत आदी डॉक्टर मंडळी उपस्थित होती.