
कुडाळ : सावंतवाडी आणि कुडाळ या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या 'कलंबिस्त–शिरशिंगे–शिवापूर' घाटमाथा रस्त्याच्या कामातील मोठी अडचण आता दूर झाली आहे. फॉरेस्ट खात्याच्या जमिनीसंदर्भातील तांत्रिक आणि प्रशासकीय पेच सोडवण्यासाठी घेण्यात आलेल्या सकारात्मक बैठकीनंतर, या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची वर्गवारी पूर्ण झाली असून सातबारा देखील तयार करण्यात आला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मार्गाचा रस्ता आता पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रशासकीय अडथळे सोडवण्यासाठी कोल्हापुरात बैठक
या मार्गासाठी लागणाऱ्या वनविभागाच्या जमिनीच्या बदल्यात आवश्यक असलेली पर्यायी जमीन वनविभागाच्या नावावर करण्याची प्रक्रिया प्रलंबित होती. ही अडचण दूर करण्यासाठी शाहूवाडी (जि. कोल्हापूर) येथील तहसीलदार श्रीमती सोनवणे मॅडम यांची विशेष भेट घेण्यात आली. जीएसटी विभागाच्या असिस्टंट कमिशनर सौ. मानसी शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समन्वयाने ही बैठक पार पडली.
या बैठकीत जमिनीच्या वर्गवारीचा प्रश्न मार्गी लावून पर्यायी जमिनीचा सातबारा वनविभागाच्या नावे करण्यात आला. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेमुळे रस्त्याच्या कामाला आता गती मिळणार आहे.
हा दुर्गम भागातील रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच कोल्हापूरचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या प्रकल्पातील प्रशासकीय अडथळे दूर होण्यास मदत झाली.
या बैठकीला कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती मोहन सावंत (शिवापूर), सार्वजनिक बांधकाम विभाग (सावंतवाडी) चे शाखा अभियंता श्री. लोहार, शिरशिंगे गावचे रहिवासी व सावंतवाडी तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख जीवन लाड, कोल्हापूर येथील उद्योजक अरुणभाई गुंजाळ, मुख्याध्यापक मनोज शेडगे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.










