LIVE UPDATES

दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयासाठी राज्य शासनाची पदनिर्मितीला मान्यता

आरोग्य सेवेला मिळणार बळकटी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 25, 2026 12:25 PM
views 26  views

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यासाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उभारण्यात येत असलेल्या दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मितीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार दिनांक 24 जून 2026 रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या आकृतीबंधानुसार आवश्यक पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या रुग्णालयातील भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यात येत असून, उर्वरित कामकाज पूर्ण झाल्यानंतर हे रुग्णालय सुसज्ज स्वरूपात सुरू होणार आहे. यामुळे दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगल्या आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.

या निर्णयासाठी माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे याबाबत मागणी लावून धरली होती.

राज्य शासनाच्या या निर्णयानंतर दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती मिळणार असून, परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

या निर्णयाबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले आहेत.