LIVE UPDATES

सिंधुदुर्गात कुटुंब नियोजनाचा भार अजूनही महिलांवरच

पाच वर्षांत 6 हजार 242 महिलांची नसबंदी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 09, 2026 20:32 PM
views 23  views

केवळ 0. 7 टक्केच पुरुषांचा प्रतिसाद 

सिंधुदुर्गनगरी : "छोटे कुटुंब, सुखी कुटुंब" हा संदेश शासनाकडून सातत्याने दिला जात असला, तरी प्रत्यक्षात कुटुंब नियोजनाची जबाबदारी अजूनही महिलांच्याच खांद्यावर असल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. २०२२ ते २०२६ या कालावधीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे ११ हजार ४४८ उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ६ हजार २८९ शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या. यामध्ये तब्बल ६ हजार २४२ महिला नसबंदी, तर केवळ ४७ पुरुष नसबंदी झाल्याने पुरुषांचा सहभाग अवघ्या ०.७ टक्क्यांवरच राहिला आहे.

आरोग्य विभागाकडून पुरुष नसबंदीबाबत सातत्याने जनजागृती, समुपदेशन, आरोग्य शिबिरे आणि विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. शासनाकडून पुरुष नसबंदीसाठी १,५०० रुपयांचे प्रोत्साहनपर मानधनही दिले जाते. तरीही समाजातील गैरसमज, भीती, संकोच आणि चुकीच्या समजुतींमुळे पुरुष या शस्त्रक्रियेकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पुरुष नसबंदी ही अत्यंत सुरक्षित, सोपी आणि काही मिनिटांत पूर्ण होणारी शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे पुरुषांच्या शारीरिक क्षमतेवर, काम करण्याच्या ताकदीवर किंवा वैवाहिक जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. तरीही अनेक पुरुष या शस्त्रक्रियेबाबत चुकीच्या समजुती बाळगत असल्याने महिलांनाच वारंवार शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागत आहेत.

उद्दिष्ट आणि पूर्ततेतही मोठी तफावत

गेल्या पाच वर्षांत ११ हजार ४४८ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट असताना केवळ ६ हजार २८९ शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या. म्हणजेच सुमारे ५५ टक्के उद्दिष्टच गाठता आले. कुटुंब नियोजन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुरुषांचा सहभाग वाढविणे ही काळाची गरज असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे.

महिलांवरच जबाबदारी का ?

तज्ज्ञांच्या मते, कुटुंब नियोजन ही पती-पत्नी दोघांची समान जबाबदारी आहे. मात्र सामाजिक रूढी, पुरुषप्रधान मानसिकता आणि नसबंदीबाबतचे गैरसमज यामुळे महिलांनाच शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते. परिणामी महिलांवर शारीरिक व मानसिक ताण अधिक पडतो.

वर्षनिहाय चित्र

- २०२२: १,३३३ शस्त्रक्रिया — महिला १,३२४, पुरुष ९

- २०२३: १,६९९ शस्त्रक्रिया — महिला १,६८८, पुरुष ११

- २०२४: १,१९९ शस्त्रक्रिया — महिला १,१८२, पुरुष १७

- २०२५: १,१२३ शस्त्रक्रिया — महिला १,११७, पुरुष ६

- २०२६ (आतापर्यंत): ९३५ शस्त्रक्रिया — महिला ९३१, पुरुष ४

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुरुषांनी गैरसमज दूर करून स्वेच्छेने नसबंदी स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. महिलांइतकाच पुरुषांचाही सहभाग वाढल्यास कुटुंब नियोजन मोहिमेला नवी दिशा मिळेल आणि "छोटे कुटुंब, सुखी कुटुंब" ही संकल्पना प्रत्यक्षात अधिक प्रभावीपणे साकार होईल.