
सावंतवाडी : जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडित प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बुधवार, दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी सावंतवाडीत 'जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबार'आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आम. निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आदींची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
हा आरोग्य दरबार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. एन. बी. रेडकर आणि अस्थायी संयोजन समिती या कार्यक्रमाचे नियोजन करत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत भूषवणार आहेत. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद सीईओ रविंद्र खेबुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, सिव्हील सर्जन डॉ. श्रीपाद पाटील आणि आरोग्य तज्ञ डॉ. धनंजय काकडे, नगराध्यक्षा सौ. श्रध्दाराजे भोसले, सभापती प्रितेश राऊळ (शिक्षण व आरोग्य), सुस्मिता जाधव (पंचायत समिती सभापती), सीओ विनायक औंधकर, बीडीओ वासुदेव नाईक, शकुंतला भालेराव, उत्कर्षा पावसकर, शेखर सामंत आदी उपस्थित राहणार आहेत. या दरबारामध्ये जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती, औषध पुरवठा, रिक्त पदे आणि रुग्णांना येणाऱ्या अडचणींबाबत नागरिक आपले प्रश्न मांडू शकणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य दरबाराला उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.














