
दूध हे बऱ्याच जणांचे आवडीचे आणि बरेच जण सकाळी दूध पिऊन शाळेला जातात. देशी गाईचे दूध हे आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे. रोज दूध पिल्याने आपल्या शरीरातील ७ घटक - रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे उत्तम प्रतीचे तयार होतात. त्वचा मऊ आणि सुंदर दिसू लागते. केसांची, नखांची वाढ सुद्धा चांगली होते. शारीरिक ताकद वाढते. काहींना दूधात बाजारात मिळणारे वेगवेगळे चॉकलेट फ्लॅव्हर्ड पदार्थ घालून प्यायची आवड असते. पण तुम्हाला माहीत आहे का की हे गोड गोड पदार्थ रोज दूधात घालून घेतले तर ते त्रासदायक ठरतात. असे दूध प्यायल्याने कफ वाढून सर्दी होऊ शकते. त्या ऐवजी दूधाला चांगली चव यावी आणि सर्दी सुद्धा होऊ नये आपली रोगांशी लढण्याची ताकद वाढावी म्हणून पावसाळ्यात दूधात काही मसाले घालायला सांगितले आहेत.
हळदीचे दूध तुम्हाला माहीत आहे ना??? हळदीचे दूध बनवायची योग्य पद्धत समजून घेऊया.
हरिद्रा, कांचनी, निशा, गौरी अशी अनेक पर्यायी नावे हळदीला दिली आहेत. हळद उष्ण असल्यामुळे शरीरातील कफ दोष कमी करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते. म्हणून सर्दी, खोकला असेल तर आजी हळदीचे दूध प्यायला देते. हळदीचे दूध बनवण्यासाठी १ कप गाईचे दूध घ्यावे, त्यात १ कप पाणी घालावे. हळद १/४ चमचा, सुंठ १/८ चमचा, २ काळ्या मिरीचे दाणे, २ लवंग खलबत्त्यात बारीक करून घालावे, चांगले उकळावे, १ कप शिल्लक ठेवावे. आवडत असेल तर १ छोटा चमचा साखर घालून, गाळून तयार दूध गरम असताना घोट घोट प्या.
रोज दूध पिणाऱ्यांनी पावसाळ्यात वरील पद्धतीने दूध घेतल्यास सर्दी, खोकला होण्याचे प्रमाण खूप कमी होईल आणि पावसाळ्यात सुद्धा रोग जंतूंशी लढण्याची ताकद चांगली राहील.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








