अभिनेता शाहरुख खानला नुकतंच न्यूज १८ कडून एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात शाहरुखने आर्यन खान ड्रग्स केसबाबात भाष्य केले आहे. शाहरुख म्हणाला, “वैयक्तिक स्तरावरही माझ्या आयुष्यात काही त्रासदायक गोष्टी घडल्या आहेत; ज्यातून मी खूप काही शिकलो आहे. मला असं वाटतं की जेव्हा परिस्थिती अवघड असते तेव्हा माणसाने शांत राहावं आणि स्वतःची प्रतिष्ठा जपत काम करीत राहावं. कारण जेव्हा तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं सुरू आहे, असं तुम्हाला वाटतं असतं तेव्हा अचानक तुम्ही जोरात जमिनीवर आपटले जाता आणि तुम्हाला कळतही नाही.”
शाहरुख पुढे म्हणाला, “गेल्या चार-पाच वर्षांत माझ्या व आणि माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यात खूप उलथापालथ झाली. कोविडमुळे माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. त्यावेळी माझे अनेक चित्रपट फ्लॉपही झाले होते, त्यानंतर अनेकांना शाहरुख खान संपला, असं वाटू लागलं होतं.''
शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान याला इतर सात जणांसह २ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आर्यन खान आर्थर रोड तुरुंगात होता. त्यानंतर आर्यनला २५ दिवसांनी जामीन मिळाला होता. त्यानंतर आर्यनला या प्रकरणी क्लीन चिटही मिळाली आहे.