
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवरील आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीवरील महायुतीची सत्ता नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हावासीय जनतेसाठी खुली झाली! भाजपासाठी मंत्री नितेश राणे शिवसेनेसाठी आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर यांनी आपापल्या मतदारसंघात आपले वर्चस्व कायम ठेवले! उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या जिल्ह्यातून भुईसपाट झाली व या पक्षाचे केवळ ३ सदस्य विजयी झाले. अपक्ष अर्थात भाजपचे बंडखोर ६ सदस्य विजयी झाले. अधिकृत भाजपच्या तब्बल २७ व शिवसेनेच्या १४ शिलेदारांनी विजय मिळवत महायुतीचा झेंडा या जिल्हा परिषदेवर पडकावीला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या लोकनियुक्त प्रशासनाची आठवी टर्म या निवडणुकीनंतर सुरू होत आहे. २१ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट होती ती आता संपुष्टात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद १९ मार्च १९९२ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर प्रथम आर बी दळवी हे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष झाले होते. त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांचे जिल्ह्यात आगमन झाले व त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर त्यांच्या नेतृत्वाखाली कायम सत्ता आली. व त्यानंतर त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना संधी दिली. वेळोवेळी धक्का तंत्राचा वापर करत तब्बल तीस कार्यकर्त्यांना त्यानी अध्यक्षपदाचा बहुमान दिला. याही निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या मिलनासाठी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला असून ते भाजप शिवसेना विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. भाजप सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या विजयाचे खरे श्रेय नारायण राणे यांना जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आता भाजप शिवसेना महायुतीची सत्ता आली असून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, सुमेधा पताडे, संदेश उर्फ गोठ्या सावंत, माजी सभापती सावी लोके, प्रीतेश राऊळ, संतोष साटविलकर, प्रमोद कामत, संजय बोबडी कणकवलीचे माजी सभापती मनोज रावराणे देवगडचे माजी सभापती सुनील पारकर मालवणच्या माजी सभापती सोनाली घाडीगावकर हे अनुभवी शिलेदार आहेत. ५० सदस्यांचा या सभागृहात मोठ्या संख्येने नवीन चेहऱ्याना संधी मिळाली आहे. महिलांच्या ५० % आरक्षणा नुसार या सभागृहात २५ महिला सदस्य निवडून आल्या आहेत. संजय पडते, जि .प . चे माजी अध्यक्ष संजय पडते, श्रीमती समिधा नाईक व माजी उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, माजी सभापती शर्वांनी गावकर व वंदना किनळेकर, जानवी सावंत, रमाकांत तामानेकर अमरसेन सावंत या नेत्यांना मात्र पराभूत व्हावे लागले आहे. भाजप शिवसेना महायुतीमुळे विरोधी पक्ष मात्र भुईसपाट झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यावर बहुमत असलेली भाजप सेना महायुतीची सत्ता आली आहे.
पंचायत समितीवरही महायुतीचा झेंडा
आठही पंचायत समित्यांवर महायुतीने वर्चस्व राखत झेंडा फडकावला आहे. एकूण १०० पैकी तब्बल ८७ जागांवर महायुतीला यश मिळाले आहे. यामध्ये भाजपाने ५८ जागांवर विजय मिळवत वरचष्मा राखला असून, महायुतीतील शिवसेनेला २८ जागांवर यश मिळाले आहे. दरम्यान, उद्धवसेनेला ७ जागांपुरतेच समाधान मानावे लागले, तर ७ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत, यातही अपक्ष म्हणून विजयी झालेले जास्तीत जास्त उमेदवार भाजपचेच आहेत. पंचायत समित्यांतील या निकालातूनही महायुतीचा स्पष्ट कौल दिसून येत असून भाजपाचे व शिवसेना महायुतीचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.










