
कुडाळ : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्या नृत्य आशिष प्रोडक्शन प्रस्तुत "अवतरली तारका" या गाण्याचा ऑफिशियल व्हिडिओ आजच प्रदर्शित झाला असून या गाण्याला सर्वत्र उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यामध्ये लावणी किंग आशिष पाटील यांच्यासोबत सिंधुकन्या दिक्षा प्रमोद नाईक ही लीड रोलमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या गाण्यामध्ये दिसणारे सहकलाकार देखील कुडाळ मधील आहेत. ही बाब कुडाळवासियांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.
दिक्षा प्रमोद नाईक हिचा जन्म कुडाळ शहरातील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. पण या सर्वसामान्य मुलीची स्वप्ने व इच्छाशक्ती असामान्य होती. तिची नृत्यामधील असणारी चमक पाहून तिच्या वडिलांनी तिचे चिमणी पाखरं डान्स अकॅडमीमध्ये ऍडमिशन करून घेतले. त्या ठिकाणी सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर यांच्या हाताला पकडून नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. हळूहळू दिक्षा नाईक हे नाव जिल्ह्यात प्रसिद्ध झाले. जिल्यातील अनेक नृत्यस्पर्धांमध्ये तिने विजेतेपदक पटकाविले. तिला इथवर येऊन थांबायचे नव्हते. तिचे स्वप्न फार मोठे होते. या स्वप्नपर्यंत जाणारा मार्ग काही सापडत नव्हता. परंतु तिचा गुरू साक्षात 'रवी' होता. अखेर 'रवीतेजामुळे' तिच्या स्वप्नांचा मार्ग देखील प्रकाशमय झाला. एका ऑडिशनमध्ये निवड झाल्यानंतर सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक लावणी किंग आशिष पाटील यांच्यासोबत काम करण्याची तिला संधी मिळाली. जणू सुप्रसिद्ध लावणी किंग पाटील यांचा 'आशिष' तिला लाभला. तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा तिच्या आयुष्याचा हा खरा टर्निंग पॉईंट ठरला. आज लावणी किंग आशिष पाटील यांच्यासोबत दिक्षा महाराष्ट्रभर आपली नृत्यकला सादर करत आहे. या प्रवासात तिला आई - वडिलांचा खंबीर पाठिंबा मिळाला. शिवाय तिची शाळा कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळच्या सर्व शिक्षकांनी वेळोवेळी तिला मुभा दिली.
"अवतरली तारका" या गाण्याचा प्रवास देखील तेवढाच खडतर आणि रंजक आहे. लावणी किंग आशिष पाटील एकदा कोकण भ्रमंतीच्या निमित्ताने सिंधुदुर्गात आले. यावेळी त्यांनी चिमणी पाखरं डान्स अकॅडमीला भेट दिली. अकॅडमीच्या मुलांचे कष्ट व टॅलेंट पाहून ते देखील थक्क झाले. चिमणी पाखरं डान्स अकॅडमीची सगळी रत्ने 'रवितेजामुळे' उजळून निघाली होती. आशिष पाटील यांच्यासारख्या रत्नपारख्याच्या नजरेतून ही चमक काही सुटू शकली नाही. अखेत या सर्व रत्नांना एकात एक गुंफून "अवतरली तारका" नावाचा रत्नजडित अलंकार त्यांनी घडवला.
एवढा मोठा प्रोजेक्ट करणे हे शिवधनुष्य पेलवण्यासारखे होते. त्यासाठी लागणारा खर्च देखील फार मोठा होता. परंतु या अडचणीमध्ये देखील अखेर पाटीलच मदतीला धाऊन आले. रवी कुडाळकर यांनी ही गोष्ट वेतोरे गावचे सुपुत्र तथा उद्योजक उमेश पाटील यांच्या कानावर घातली. उमेश पाटील यांनी कशाचीही अपेक्षा न ठेवता केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांसाठी या गोष्टीला लगेच होकार दर्शविला.
"अवतरली तारका" या गाण्याचे स्वर मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित गायक रोहित राऊत यांच्या गोड गळ्यातून उमटले आहेत. रोहित राऊत यांनी गायलेल्या गाण्याचे स्वर कानावर पडताच प्रत्यक्ष तारका पृथ्वीवर उतरल्याचा भास होतो. हे गाणे सिंधुपुत्र राहुल कदम व प्रणव चांदोरकर यांनी संगीतबद्ध केले. या गाण्याचे चित्रीकरण सुप्रसिद्ध डी. ओ. पी. सूरज राजपूत यांनी केले आहे. गाण्याचे मॅनेजमेंट ओंकार पंड यांनी तर शाल्मली जरीपटके यांनी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम पाहिले. या गाण्यातील निम्म्याहून अधिक कलाकार हे सिंधुदुर्गातील असून गाण्याचा डी.एन. ए. मालवणी आहे असे म्हटले तरी योग्य ठरेल.
चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या अनेक कलाकारांनी आपली नृत्यकला सादर केली आहे. एकंदरीत या चिमणी - पाखरांनी या गाण्याच्या माध्यमातून गरुडझेप घेतली आहे. "अवतरली तारका" हे सर्वांचे स्वप्न असून नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील व उद्योजक उमेश पाटील यांच्यामुळेच ते सत्यात उतरले आहे. हे गाणं आपल्याला नृत्य आशिष प्रोडक्शन https://youtu.be/ldn6Ouvyi4c?si=bZFMe4sfS3AwYiL0 या युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.
सहकलाकार- संजना पवार, साक्षी परब, सिमरन नायर, सलोनी सावंत, दुर्वा परब, विशाखा धामापूरकर, तनिषा नाईक, अंतरा ठाकूर, प्राची जाधव, प्राची पाटकर,
आर्ट टीम - अभिषेक जाधव, नितेश कुणकावळेकर, अमोल जाधव,
विशेष सहाय्य- श्री देव रामेश्वर मंदिर तेरसे बांबर्डे, सुनील भोगटे, बादशाह शेख, प्रणाली वानखेडे, शेखर सातोसकर, निखिल कुडाळकर, सुजय जाधव, रश्मी नेमळेकर, महेश राऊळ डेकोरेटर्स














