
कणकवली : मडगांवच्या दिशेने जाणार्या वंदे भारत एक्सप्रेसची धडक ट्रॅकवर आलेल्या पाळीव गुरांना बसली. यामंध्ये तीन गुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कुडाळ ते सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकादरम्यान सोमवारी सकाळी ११.५० वा. सुमारास घडली. घडल्या प्रकारामुळे रेल्वे ट्रॅक जवळपास अडीच तास बंद होता. परिणामी कोकण रेल्वेचे वेळापत्रकही विस्कळीत झाले होते. रेल्वे गाड्या ठिकठिकाणच्या स्थानकांमध्ये थांबवाव्या लागल्या होत्या. परिणामी प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला.
कणकवली स्थानकातून मार्गस्थ झालेली वंदे भारत एक्सप्रेस सिंधुदुर्ग स्थानक ओलांडून कुडाळच्या दिशेने जात असताना कुडाळ रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर ट्रॅकवर आलेल्या गुरांना ट्रेनची धडक बसली. धडकेत तीन गुरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वंदे भारत एक्सप्रेस बराच वेळ जागीच थांबलेली होती.
घटनेची माहिती समजताच रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांसह कोकणा रेल्वेच्या अन्य कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत जनावरे ट्रॅकवरच असल्याने ट्रॅक सुरु ठेवणे शक्य नव्हते. परिणामी मार्गावरील रेल्वेगाड्या ठिकठिकाणी उभ्या कराव्या लागल्या.
यात मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस कुडाळ स्थानकावर ३ तास ४५ मिनिटे, मडगांव हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस झाराप स्थानकावर सव्वा तास, एर्नाकुलम एलटीटी दुरांतो एक्सप्रेस सावंतवताडी स्थानकावर दोन तास, एर्नाकुलम अजमेर मडुरे स्थानकावर पावणे तीन तास, मडगांवला जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस सिंधदुर्ग स्थानकावर तीन तास थांबली होती.










