
कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत आणि उद्योजक उमेश यशवंत पाटील निर्मित *अप्सरा* हा डान्स शो सर्वांच्या भेटीला येत असून रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी सायं. ६ वाजता मराठा समाज सभागृह कुडाळ येथे या शोचा पहिला प्रयोग सादर होणार असल्याची माहिती चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे सल्लागार सुनील भोगटे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. चिमणी पाखरं डान्स अकॅडमीने मुलांना नृत्यापुरतं शिक्षण न देता त्यांना चंदेरी दुनियेत नेण्याचा प्रयत्न नेहमीच या अकॅडमीच्या माध्यमातून नृत्य दिग्दर्शक रवी कुडाळकर यांनी केला आहे. या साठी उद्योजक उमेश पाटील या दानशूर व्यक्तीचे सहकार्य त्यांना वेळोवेळी मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चिमणी पाखरं डान्स अकॅडमी नेहमी नवनवीन प्रयोग करत असते. यावेळी अप्सरा या नव्या डान्स शो च्या माध्यमातून एक नवा प्रयोग केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. यामध्ये निर्माते उमेश पाटील यांची कन्या कृपा हिने अकॅडमीतील इतर चिमणी पाखरांचा संच तयार केला असून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने उद्योजक उमेश पाटील, नृत्य दिग्दर्शक रवी कुडाळकर आणि सर्व पालकांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचे चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे सल्लागार सुनील भोगटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संचालक तथा नृत्य दिग्दर्शक रवी कुडाळकर म्हणाले की, यापूर्वी अकॅडमीच्या माध्यमातून तारका सारखे अनेक प्रकल्प राबवण्यात आले. यावेळी लहान मुलांना रंगमंच उपलब्ध करून देण्याचे वेगळा प्रयत्न असून अप्सरा नावाच्या नव्या डान्स शोचे आयोजन करण्यात आले आहे. ज्याची टॅगलाईन छोटे कलाकार, मोठा रंगमंच अशी देण्यात आली आहे.
पुढे ते म्हणाले की, रंगमंच हा प्रत्येक कलाकारासाठी मोठाच असतो. हे छोटे कलाकार जेव्हा मोठ्या रंगमंचावर आपली कला सादर करतील तेव्हा एक सुंदर कलाकृती आपल्याला अनुभवता येईल. शिवाय जसा प्रतिसाद तारकाला मिळाला तसाच प्रतिसाद अप्सराला देखील मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यानंतर त्यांनी या कार्यक्रमाचे निर्माते आणि उद्योजक उमेश पाटील यांचे मुक्तकंठाने कौतुक केले. आपण सगळी सोंग घेऊ शकतो पण पैशाचे नाही. या कार्यक्रमाचा पुर्ण खर्च उमेश पाटील यांच्या माध्यमातून होत असून अकॅडमीच्या सर्व मुलांमध्ये ते आपल्या मुलीला पाहतात. आपली मुलं नेहमी पुढे गेली पाहिजेत असं त्यांना नेहमी वाटतं. अशा शब्दात त्यांनी उद्योजक उमेश पाटील यांचे कौतुक केले.
रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी सायं. ६ वाजता या डान्स शो चा पहिला प्रयोग सादर होणार असून २१ मुलांचा चमू हा कार्यक्रम सादर करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संचालक तथा नृत्य दिग्दर्शक रवी कुडाळकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.














