ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे 82व्या वर्षी निधन

पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 24, 2022 07:15 AM
views 184  views

पुणे : रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, वेब मालिका अशा विविध माध्यमांद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. २३ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. वयाच्या ८२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरु होते. तब्येत प्रचंड खालावल्यामुळे त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना वेंटिलेटवर ठेवण्यात आले होते.

विक्रम गोखले यांनी 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. मल्हारने आपल्या गाण्याचं शिक्षण ज्यांच्याकडून घेतलं त्या गुरुजींची भूमिका विक्रम गोखले साकारताना दिसले होते. यापूर्वी त्यांची अग्निहोत्र ही मालिका विशेष गाजली होती. या मालिकेत त्यांनी मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका साकारात प्रेक्षकांची मने जिंकली होती. विक्रम गोखले यांना 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

आजवर त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. विक्रम गोखले यांनी टीव्ही सीरियल, बॉलिवूड, मराठी सिनेमांत अनेक भूमिका गाजविल्या आहेत. अभिनेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. सिनेमांमध्ये मिळेल त्या भूमिकेस योग्य न्याय त्यांनी दिला. त्यांचा मोठा चाहता वर्गही आहे, मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता.