ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन

'लक्ष्यामामां'च्या भावाची चटका लावणारी एक्झिट
Edited by: ब्युरो
Published on: December 13, 2023 16:09 PM
views 170  views

मुंबई : मराठी सिनेसृष्टीला अनेक नामवंत कलाकार लाभले. या कलाकारांनी सिने इंडस्ट्री उत्कृष्ट काम करून उत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर केल्या. पण आज या मराठी इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेमां मधील उत्कृष्ट अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. रवींद्र बेर्डे यांनी मराठी सोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला होता. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रवींद्र बेर्डे यांना मागील काही वर्षांपासून घशाचा कर्करोग झाला होता. त्यासाठी त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचारही सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले. मात्र उपचारानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी देखील सोडले. सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पाठी पत्नी, दोन मुलं, सुना नातवंड असा परिवार आहे.

रवींद्र बेर्डे यांच्या आणखीन एक ओळख म्हणजे ते मराठी चित्रपट सृष्टीचा बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. आपल्या भावासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. रवींद्र यांच्या विनोदी भूमिका फार गाजल्या.

खरे तर ‌१९९५ मध्येच व्यक्ती आणि वल्ली या नाटकाच्या वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता, पण त्यातून त्यांनी स्वतःला सावरले. २०११ मध्ये त्यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. तेव्हापासून ते आजतागायत ते या आजाराशी लढा देत होते, मात्र आज त्यांच्या या लढ्याला अपयश आले आणि त्यांची प्राणज्योत मावळली.