
वेंगुर्ला : कोकणच्या लोककलेचे आणि संस्कृतीचे प्रतिक असलेला ‘दशावतार‘ आता मराठी चित्रपटाच्या रूपाने रूपेरी पडद्यावर साकारणार आहे. या ‘दशावतार‘ चित्रपटात वेंगुर्ला तालुक्यातील भेंडमळा येथील सुपुत्र आणि दशावतारी कलाक्षेत्रातील खलनायक गोपाळ तेरेखोलकर याने भूमिका साकारली आहे. त्याला मिळालेल्या या संधीबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.
‘दशावतार‘ या चित्रपटाचे चित्रीकरण वालावल, वेतोरे, केळूस, धामापूर, सरमळ या भागात झाले असून यामध्ये ज्येष्ठ सिनेअभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांच्यासारखे दिग्गज अभिनेते कार्यरत आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संजय लाड, संतोष रेडकर, दादा राणे-कोनस्कर, यश जळवी, गोपाळ तेरेखोलकर व ज्ञानेश्वर तांडेल या दशावतारी कलाकारांचा समावेश आहे. आपल्यासाठी ही संधी अनपेक्षित असून सर्वांच्या पाठींब्यामुळेच हे साध्य झाल्याचे गोपाळ तेरेखोलकर आवर्जून सांगतो.