‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी अशोक सराफांच्या नावाची शिफारस करणार : सुधीर मुनगंटीवार

Edited by: ब्युरो
Published on: August 21, 2023 13:17 PM
views 147  views

पुणे : मराठीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयातून कायमच प्रेक्षकांची वाहवाह मिळवली आहे. प्रेक्षकांना हसवायचो असो किंवा त्यांना प्रेक्षकांना भावूक करायचे असो ते कायमच आपली भूमिका चोख बजावताना पाहायला मिळतात. त्यामुळेच त्यांना आत्तापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. नुकतेच त्यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते. याचवेळी अशोक सराफ यांच्या नावाची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याची घोषणा मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ही घोषणा झाल्यानंतर अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचे आभार मानले.

यावेळी बोलताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, रडण्याचा अभिनय करून लोकांना रडवणे हे कठीण काम आहे, त्याचप्रमाणे हसवण्याचा अभिनय करून समोरच्याला हसवणे हे महाकठीण काम आहे. हे महाकठीण काम अशोक सराफ यांनी अनेक वर्षे केले, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नावे सुचवायची असतात, त्याचा मी अध्यक्ष आहे. मी विचार करत होतो की कोणती कोणती कशी नावे सुचवायची. इथे आल्यावर माझा निर्णय पक्का झाला की महाराष्ट्र सरकारच्या वतीने पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांचे नाव निश्चितपणे पाठवले पाहिजे आणि ते आम्ही पाठवणार, अशी घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली.

सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही घोषणा होताच अशोक सराफ यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मी माझे कर्तव्य समजतो की मी इथे एकटा उभा नाही. कुठल्याही गोष्टीला पाठून टेकू लावतात ना त्याप्रमाणे तुम्ही सगळे माझ्या पाठिशी उभे आहात. आजचा सत्कार मी कधीही विसरू शकत नाही. कलेच्या क्षेत्रात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असताना कलाकाराला प्रेक्षकांकडून मिळणारे पाठबळ फार महत्वाचे असतात, त्याशिवाय कलाकाराचे प्रयत्न व्यर्थ आहेत. मला कायमच असे पाठबळ महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी दिले, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.