संगीतातला ध्रुवतारा राजयोगचं सुमधुर गणेशगीत येतंय गणेशभक्तांच्या भेटीला

29 ऑगस्टला झी मराठीवर राजयोग झळकणार मानसी नाईकसोबत
Edited by: अर्जुन धस्के
Published on: August 28, 2022 11:39 AM
views 223  views
हायलाइट
कोकणचा सुपुत्र, संगीतातला ध्रुवतारा...राजयोग धुरी
गणेशोत्सवात रंगत आणणार राजयोगचं खास गणेशगीत
राजयोगच्या गाण्याची अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा

सिंधुदुर्ग : कोकणच्या या भुमीनं महाराष्ट्रालाच नव्हे तर जगभरातल्या रसिकांना अनेक चांगले कलाकार दिलेत. कलेची हीच गौरवशाली परंपरा पुढं नेण्याचं काम नव्या पिढीतले काही कलाकार अत्यंत प्रामाणिकपणे आणि मोठया कौशल्यानं करताहेत. या सर्वांमध्ये अगदी आकाशातल्या ध्रुवता-याप्रमाणे चमकतोय तो संगीतातला ध्रुवतारा, म्हणजेच कोकणचा सुपुत्र, राजयोग धुरी. 'मी होणार सुपरस्टार' या स्टार प्रवाहच्या शोमध्ये दैदीप्यमान यश मिळवल्यानंतर चतुर्थीत त्याच खास गणेशगीत रसिकांच्या भेटीला येतंय. विशेष म्हणजे या गाण्यात स्वतः राजयोग प्रसिध्द नृत्यांगणा मानसी नाईकसोबत झी मराठीच्या पडदयावर झळकतोय. हे गाणं  29 ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येतंय.

राजयोग धुरी...मुर्ती लहान पण संगीतातली कामगिरी आणि किर्ती आसमंत भारून टाकणारी...वडीलधा-यांकडुन मिळालेलं संगीताचं हे देणं लहान वयापासुनच आपला श्वास म्हणुन जपणा-या राजयोगनं आपल्या सुरांची जादु अगदी लहान वयातच दाखवली. सदगुरू वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशनमध्ये त्यानं नामसंकीर्तन गात आपल्या या प्रवासाला दैवी सुरूवात केली. सदगुरूंच्या आशिर्वादानेच आपल्या करीयरचा प्रारंभ होण्याचं भाग्य खुप कमी कलाकारांना लाभतं. राजयोग मात्र त्याबाबतीत नशीबवान ठरला. पुढं त्यानं वयाच्या 12 व्या वर्षीपासुन प्रसिध्द गायक पंडीत अजित कडकडे यांच्याकडे संगीताचे धडे घ्यायला सुरूवात केली. अतिशय सकस अशा जमिनित कसदार बियाणं रूजावं, तसं कडकडे बुवांचं गाणं राजयोगच्या कणाकणात फुललं आणि सुरू झाला तालासुरांचा एक अनोखा राजयोग....

राजयोगच्या या वाटचालीला खरी उभारी मिळाली ती स्टार प्रवाहवरच्या 'मी होणार सुपरस्टार' या शो मधुन. असे शो केवळ मनोरंजन नसतात तर चुरशीची स्पर्धा असते. इथ खरा गाण्याचा आणि गायकीचा कस लागतो. राजयोगनं आपल्या अथक परिश्रमानं हेही व्यासपीठ जिंकलं आणि याच व्यासपीठावरून तो अवघ्या महाराष्ट्रभर छोटे उस्ताद तसंच ध्रुवतारा म्हणुन उदयाला आला. या मंचावर अनेक बडया कलाकारांनी राजयोगच्या गाण्याचं भरभरून कौतुक केलं. याच मंचावर त्यानं आपल्या वैविद्यपुर्ण गायकीचं दर्शन घडवून अवघ्या मराठी रसिकांना तृप्त केलं.

या ध्रुवता-यावर संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांची नजर पडली नसती तरच नवल. मोरेश्वर प्रसन्न प्रॉडक्शन हाऊसनं हे रत्न हेरलं आणि चतुर्थीत राजयोगच्या आवाजातली एक सुरेल कलाकृती गणेशभक्तांना देण्याचं निश्चित केलं. छुम छुम छन नन नाचे, नाचे गौरीनंदन असे नादांमधलेच गाण्याचे बोल आहेत. विशेष म्हणजे राजयोगने हे गाणं गायलं तर आहेच परंतु प्रसिध्द नृत्यांगणा मानसी नाईकसोबत प्रथमच व्हीडीओत अभिनयही केलाय. हे गाणं आपल्याला झी मराठी वाहीनीवर पाहता येणार आहे.

कोकणच्या या सुपुत्रानं अतिशय मेहनतीनं अगदी लहान वयातच आपल्या संगीतमय प्रवासाला अगदी लक्षवेधी सुरूवात केलीय. या प्रवासात आई वडीलांचं पाठबळ आणि प्रोत्साहन हे त्याला श्वासाइतकचं महत्वाचं ठरतंय. देवगडच्या भुमीतल्या या धुरी कुटूंबानं कोकणच्या कलेचा वारसा मोठया अभिमानानं आज पुढं नेण्याचं काम केलंय. इतक्या लहान वयात उपशास्त्रीय ते भावगीत, गझल, चित्रपटगीते असा वैविद्यपुर्ण प्रवास करणा-या राजयोगचं संगीत क्षेत्रातील योगदान निश्चितच अवघ्या कोकणसाठी अभिमानास्पद आहे. छोटे उस्ताद ते ध्रुवतारा असा प्रवास करणारा राजयोग येत्या काही दिवसात निश्चितच आपल्या तेजस्वी गायकीने लवकरच संगीतसुर्य ठरेल, यात शंका नाही.