विक्रम गोखलेंचं निधन ही अफवा; प्रकृती चिंताजनक | पत्नीचा खुलासा

गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात उपचार आहेत सुरु
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 24, 2022 10:32 AM
views 682  views

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाल्याची बातमी चुकीची असल्याचं त्यांची पत्नी वृषाली यांनी म्हटलं आहे. विक्रम गोखलेंच्या निधनाचं वृत्त ही अफवा असून ते सध्या व्हेंटीलेटरवर आहेत असं वृषाली यांनी सांगितलं आहे.


“काल सायंकाळी ते कोमामध्ये गेले. त्यानंतर ते स्पर्शालाही प्रतिसाद देत नसून त्यांना सध्या व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे, ते प्रतिसाद देत आहेत की नाही यासंदर्भात डॉक्टर सकाळी निर्णय घेतील,” असं विक्रम गोखेलेंच्या पत्नी ऋषाली यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं आहे. सरकारी ट्विटर हॅण्डलपासून अजय देवगण, जावेद जाफरी यासारख्या सेलिब्रिटींनीही रात्री उशीरा विक्रम गोखलेंना श्रद्धांजली अर्पण करणारी ट्विट केल्याने गोखलेंच्या मृत्यूसंदर्भातील संभ्रम निर्माण झाला होता. याचसंदर्भात स्पष्टीकरण देताना पत्नी वृषाली यांनी ही माहिती दिली आहे.गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुटुंबियांनी या अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी ट्विटरवरुन पोस्ट केल्याने विक्रम गोखले हे सोशल मीडियावर चर्चेत आले.


विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. बुधवारी रात्री त्यांची तब्येत खालवल्याचे वृत्तही समोर आले होते. बुधवारी रात्री उशीरा त्यांची प्रकृती खालवली.