
सावंतवाडी : तालुक्यातील कारिवडे गावात गेल्या काही तासांपासून विजेचा प्रचंड खेळखंडोबा सुरू असून, महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आज, २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळपासून दर १० मिनिटांनी वीज खंडित होत असल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे. नुकताच हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक आधीच हैराण असताना, आता विजेच्या सततच्या लपंडावाने त्यात भर टाकली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असून गावात विविध समारंभांची लगबग सुरू आहे. मात्र, सायंकाळपासून सुरू झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे मंगलकार्यात आणि घरगुती कामात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. "दर १० मिनिटांनी वीज जाणे आणि येणे हा प्रकार अत्यंत त्रासदायक आहे. जर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ही स्थिती असेल, तर भीषण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात आमचे काय हाल होणार?" असा संतप्त सवाल कारिवडेतील ग्रामस्थ विचारत आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर वीज पुरवठा सुरळीत असणे गरजेचे असताना महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तातडीने यावर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.











