
वेंगुर्ले : श्री देव विश्वेश्वर सांब सदाशिव भटवाडी वेंगुर्ला व गृहिता महिला औद्योगिक सहकारी संस्था वेंगुर्ला यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गृहिता महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेविका गौरी मराठे यांच्यावतीने सलग तिसऱ्या वर्षी "मी गृहीता २०२६" अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रम महिलांसाठी पर्वणीच ठरणार आहे. यात "मी गृहीता २०२६" स्पर्धेत प्रथम विजेत्या गृहितेला फ्रीज, द्वितीय विजेत्या गृहितेला एलईडी टीव्ही व तृतीय विजेत्या गृहितेला शेगडी अशी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर यावेळी महिलांसाठी व प्रेक्षकांसाठीही बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ मार्च सायंकाळी ५ वाजल्यापासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महिलांसाठी विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या असून विविध आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
शुद्ध शाकाहारी पाककला स्पर्धा
खेळ गृहिणींचा सन्मान गृहितांचा, " मी गृहिता २०२६", एक दिवस मनोरंजनाचा अंतर्गत शुद्ध शाकाहारी पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात विविधतेत एकता म्हणजेच दाक्षिणात्य, गुजराती, पंजाबी, गोवन, बंगाली "पंचप्रांतीय पाककृती" हा विषय ठेवण्यात आला आहे. यामध्ये प्रथम तीन क्रमांकास अनुक्रमे रोख ५ हजार, ३ हजार , २ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.
मी गृहीता २०२६ फॅशन शो
या कार्यक्रमात "मी गृहीता २०२६" या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले असून यात पारंपरिक वेशभूषा, टॅलेंट राउंड, वेस्टर्न कॉश्च्युम व प्रश्नोत्तर राउंड अशा फेऱ्या असणार आहेत. यात प्रथम येणाऱ्या तीन गृहितांना अनुक्रमे रोख ७ हजार, ५ हजार, ३ हजार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत.
पुरुषांसाठीही विशेष स्पर्धा
पुरुषांच्या हातालाही चव असते अंतर्गत पुरुषांसाठी महाराष्ट्रातील पारंपरिक पाककृती स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत पुरुषांनीच डिश बनवणे अनिवार्य असणार आहे. या स्पर्धेतील प्रथम ३ विजेत्यांना रोख ५ हजार, ३ हजार , २ हजार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
लकी ड्रॉ व स्पॉट गेम्सची मेजवानी
या कार्यक्रमात लकी ड्रॉ व स्पॉट गेम्सही ठेवण्यात आले आहेत. यात इस्त्री, कुकर, जुसर, डिनर सेट, फॅन, शेगडी, इंडक्शन, वॉटर हिटर, कप सेट यासहित इतर २५ बक्षिसे लकी विजेत्यांसाठी व स्पॉट गेम मधील विजेत्यांसाठी ठेवण्यात आली आहेत.
श्री देव विश्वेश्वर सांब सदाशिव देवस्थान कॅम्प भटवडी वेंगुर्ला या ठिकाणी होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांसाठी ५ मार्च सायंकाळी ५ वाजेपर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ९४२०७४२२४७/ ९०४९३१६८००/ ९८९०४४४६६५ या क्रमांकावर संपर्क करावा व सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.











