
दोडामार्ग : दोडामार्ग येथील स्वामी माऊली प्रोडक्शन या युवा टीमने आजच्या तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. तरुणांमध्ये वाढत चाललेल्या ड्रग्स, गांजा, तंबाखू, गुटखा यांसारख्या अमली पदार्थांच्या व्यसनाबाबत जागृती करण्यासाठी त्यांनी “ड्रग्स सेवन” हा लघुचित्रपट तयार करून विविध शाळा व महाविद्यालयांत प्रदर्शित केला.
आजची तरुण पिढी अमली पदार्थाच्या आहारी जात असून, त्यातून होणारे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम वाढत चालले आहेत. हे व्यसन रोखण्यासाठी आणि तरुणांना योग्य दिशादर्शन करण्यासाठी या टीमने हा लघुपट निर्मित केला आहे. लघुपटाचे दिग्दर्शक करण शेटकर, प्रो. अध्यक्ष विकास तर्पे, संगीत राजेश नाईक, बिरोबा कोळापटे व अमृता भोसले यांनी तरुणांनी व्यसनापासून दूर राहून स्वस्थ व सुरक्षित आयुष्य जगावे, असे आवाहन केले. या लघुपटाचे प्रदर्शन दोडामार्ग तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी, कुडासे हायस्कूल, नूतन विद्यालय, कळणे, ज्युनियर कॉलेज, दोडामार्ग, दीपक केसरकर कॉलेज, शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे येथे करण्यात आले. विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगत व्यसनमुक्त तरुणाई, सक्षम भविष्य असा संदेश देण्यात आला. तसेच संपूर्ण राज्यातील तरुण पिढीने नशामुक्त होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही टीमने केले.














