सावंतवाडीत महास्वच्छता अभियानाचा समारोप

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 23, 2026 11:18 AM
views 18  views

सावंतवाडी : स्वच्छतेमुळे आरोग्य सुदृढ राहते आणि समाज निरोगी बनतो, असा संदेश देत संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात आयोजित महास्वच्छता अभियानाचा समारोप आज करण्यात आला. प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, कचरा करू नका, घराभोवती स्वच्छता ठेवा, शहर आपोआप स्वच्छ राहील, असे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले, स्वच्छता कर्मचारीही माणूसच असून आपण केलेली घाण साफ करताना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गटारात उतरून किंवा कचऱ्यात काम करताना होणारी यातना लक्षात घेऊन प्रत्येकाने जबाबदारीने वागावे. नागरिकांनी स्वच्छता राखली तर सफाई कर्मचाऱ्यांचे कामही सुलभ होईल आणि शहर स्वच्छ-सुंदर बनेल. सावंतवाडी नगर परिषद आयोजित या अभियानाच्या समारोप कार्यक्रमास आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन व वित्त सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका सुनीता पेडणेकर, निलम नाईक, स्नेहा नाईक, ॲड. सायली दुभाषी, माजी नगरसेवक विलास जाधव, ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र टेमकर, न.प. अधिकारी वैभव अंधारे, विनोद सावंत तसेच कर्मचारी, विद्यार्थी, पोलीस प्रशासन, महिला बचत गट व समता महिला मंडळ सहभागी झाले.

शहरातील विविध भागांत स्वतंत्र पथकांद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुणांच्या सहभागामुळे अभियान यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी “स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि कचरामुक्त शहर” करण्याची सामूहिक शपथ घेतली. तद्नंतर शहरात स्वच्छता करत या मोहिमेचा समारोप करण्यात आला‌. अभियानात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांचे मान्यवरांनी आभार मानले.