कोकणचा राखणदार 'दशावतार' !

निसर्ग संवर्धनाचा संदेश ; बेरोजगारीची मांडली व्यथा !
Edited by: विनायक गांवस
Published on: September 16, 2025 17:50 PM
views 38  views

तळकोकणातही चित्रपट हाऊसफुल्ल !

सावंतवाडी : झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या ''दशावतार' चित्रपटाचे सध्या खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात कोकणातील जंगलं, झाडं, कातळशिल्प वाचवण्यासाठीचा संदेश देताना इथल्या बेरोजगार तरुणांची कैफियत देखील सुरेख पद्धतीने मांडली आहे. कोकणी माणसानेच कोकण जपण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, आपली संस्कृती टिकवायला हवी असा  संदेश यातून दिला आहे. विकेंडनंतरही भरभरून प्रतिसाद मिळत असलेल्या या सिनेमानं 4 दिवसांत 6.23 कोटींचा गल्ला जमवला आहे. ही घोडदौड अशीच सुरूच राहिल्यास हा चित्रपट बॉलिवूडच्या सिनेमांना टक्कर देणारा मराठमोळा चित्रपट ठरणार आहे. 


हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूडच्या स्पर्धेच मराठी चित्रपट सृष्टी देखील कुठे कमी नाही.‌ एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती सध्या मराठी चित्रपट सृष्टीत होताना दिसत आहे. दशावतार हा चित्रपट देखील त्यातील एक आहे. कोकणी माणसाशी निगडित असणारा हा सिनेमा आहे. यात मालवणी भाषेतून झालेला संवाद अधिक भावतो. एवढंच, नाही तर कथानकात इथल्या बेरोजगार तरुणांची कैफियत देखील मांडली आहे. बापाची हयात दशावतारात गेलेली असताना त्याच्या शेवटच्या काळात वाऱ्यावर सोडून न जाणारा मुलगा यात दाखवला आहे. नोकरी मिळत नसल्याने वडिलांच्या दशावतारातून मिळणाऱ्या उत्पन्नातून चालणारा उदरनिर्वाह यात चित्रित केला आहे. ''रात्रीचा राजा अन् सकाळी कपाळावर बोजा !'' ही दशावतार कलावंतांची परिस्थिती देखील यात वर्णीली आहे. नोकरीला मुंबई गाठली तर रातांधळेपणाने ग्रस्त बाप एकटा पडेल अन् त्याचा सहवासही मिळणार नाही, ही एका मुलाची व्यथा अगदी सहज रित्या साकारली आहे. पदरी शिक्षण असूनही नोकरीसाठीचा वनवास कथन केला आहे. यातूनच नाईलाजाने गावातील एका खाणीत तो युवक नोकरी स्वीकारतो. पण, जेव्हा गावातील कातळ देवावर अन् गावाच्या जमीनीवर डोळा पडतो तेव्हा त्या भुमिपुत्रानं केलेला संघर्ष यात दिसतो. गावात बोभाटा होऊ नये म्हणून धनदांडग्यांच्या 'पे रोलवर' असलेले पोलिस, वन अधिकारी अन् सरपंच यात दाखवले आहेत. यातूनच ते त्या मुलाचा खून करून, आत्महत्या केल्याचे भासवतात. त्या युवकाच्या मोबाईलमध्ये बापाला पुरावे सापडल्याने त्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न होतो. मात्र, जंगलातील राखणदार रक्षण करतो अन् सुरू होतो खरा ''दशावतार'' ! एक बाप मुलाच्या खुनाचा बदला घेताना गावच्या रक्षणासाठी धारण करत असलेला रूद्रावतार या ''दशावतारा''तून साकारण्यात आला आहे. कोकणातील जंगलात आढळणारा 'ब्लँक पॅथर' राखणदाराच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे. कोकणचा दशावतार देखील यातून दाखविण्यात आला आहे.


झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे‌. त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, दिग्दर्शक तथा अभिनेते महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत. स्थानिक दशावतार कलावंतांचाही समावेश ठासून दिसतो. चित्रपट संगीत ए.व्ही. प्रफुल्लचंद्र तर गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. यातील "आवशीचो घो" ओंकारस्वरूप, "परंपरागत गणेश स्तवन" अमोल मोचेमाडकर, "ऋतुचक्र" साहिल कुलकर्णी, स्वानंदी सरदेसाई तर "रंगपूजा" गीत अजय गोगावले यांनी गायले आहे. 


ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचे अभिनय कौशल्य ठासून दिसत आहे. वयाच्या ८१ वर्षीही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. बाबुली मेस्त्री या वयस्क दशावताऱ्याची भूमिका त्यांनी साकारली आहे. महेश मांजरेकर यांची भूमिका देखील ठासून दिसते. ज्येष्ठ कलावंत व युवा कलावंताचा मिलाफ असलेला या चित्रपटाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत असून कोकणातील वालावल, नेरूर, धामापूर आदी भागातील छायाचित्रण तर अफलातून आहे. कोकणचा निसर्ग या उठून दिसत असून ''कोकणी माणसानेच, कोकण जपायला हवं !'' हा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे.