‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे चित्तथरारक पोस्टर भेटीला

Edited by:
Published on: January 15, 2024 07:05 AM
views 260  views

आपल्या अचाट धैर्याने आणि अजोड पराक्रमाने शत्रूला झुंजविणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कधीही हार न मानणारे साहसी योद्धा व कुशल राज्यप्रशासक. या पराक्रमी योद्धयाचा अतुलनीय इतिहास उलगडून दाखविणारा छत्रपती संभाजी महाराजांवरील मराठीतला पहिला भव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा’ १६ फेब्रुवारी २०२४ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट यांची प्रस्तुती आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्तथरारक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

बलदंड शरीरयष्टी, करडी नजर आणि जबरदस्त आत्मविश्वासासह छत्रपती संभाजी महाराज एका शक्तिशाली वाघासोबत झुंज देताना या पोस्टरमध्ये दिसताहेत. पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांची ही भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य मराठमोळा अभिनेता भूषण पाटील यांनी उचललं आहे. ‘स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने स्वराज्याच्या संरक्षणासाठी संभाजीराजांनी स्वतः मरणांतिक यातना सहन करून, स्वराज्याला जीवनदान देणाऱ्या अशा या महान पराक्रमी राजाची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे भूषण सांगतो.

मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.