
नवी दिल्ली : सनी देओलच्या आगामी 'सूर्या: अंत से आरंभ तक' (Suryaa: Ant Se Aarambh Tak) या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरसोबतच चित्रपटाच्या रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. सनी देओलने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरही हे पोस्टर शेअर केले आहे. या मोशन पोस्टरमुळे चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
'सूर्या: अंत से आरंभ तक' असे टायटल असलेल्या या चित्रपटाचे प्रदर्शन २० नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. मोशन पोस्टरमध्ये सनी देओलचा एक दमदार आणि प्रभावी लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एम. पद्मकुमार यांनी केले आहे.
रिलिज झालेल्या या 'फर्स्ट लूक'मध्ये सनी देओलचा रुबाबदार अंदाज दिसून येतो. ओठांमध्ये पेटलेली सिगारेट आणि दाट दाढी त्याच्या या लूकला अधिक प्रभावी बनवतात. मोशन पोस्टरसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे: "भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातील द्वंद्वात अडकलेला तो... सत्य शोधून काढतो!"
सनी देओलव्यतिरिक्त अभिनेता रवी किशनही या चित्रपटात दिसणार आहे. दीपक मुकुट, हेमंत मुकुट, लोकेश मुकुट आणि कमल मुकुट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सोशल मीडिया युजर्सनी सनी देओलच्या लूकवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अलीकडेच सनी देओलचा 'बंटवारा १९४७' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' (Awarapan 2) सोबत त्याची टक्कर झाली होती आणि या स्पर्धेचा बॉक्स ऑफिसवरील कमाईवर परिणाम झाला होता.
आता सनी देओलचा 'सूर्या' २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, इम्रान हाश्मीचा 'गनमास्टर जी९' (Gunmaster G9) हा चित्रपट २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'गनमास्टर जी९' हा आदित्य दत्त दिग्दर्शित रोमँटिक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. इम्रान हाश्मीव्यतिरिक्त, या चित्रपटात जेनेलिया देशमुख आणि अपारशक्ती खुराना दिसणार आहेत.














