सावंतवाडी : 'सारेगमप' लिटिल चॅम्प या झी मराठी वाहिनीवरील प्रसारित झालेल्या कार्यक्रमातून घरोघरी पोहोचलेली पंचरत्न अर्थात आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत रत्नागिरी चिपळूणचा प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन. यातील 'आमचं ठरलय' असं सांगत रिलेशनशिपबद्दल माहिती देणारी महाराष्ट्रातील क्युट जोडी म्हणून समोर आलेल्या मुग्धा आणि प्रथमेशनं सावंतवाडीतील स्वयंभू देवस्थान ओटवणे रवळनाथ मंदिराला भेट दिली. मंदिराचा इतिहास आणि देवस्थान विषयी जाणून घेतलं. याआधी 'राणादा व पाठक बाई' ही रिल व रिअल लाईफमधील जोडी ओटवणेत येऊन गेली होती. मात्र, मुग्धा आणि प्रथमेशच्या ओटवणे भेटीचं निमीत्त होत गाभाऱ्यातील गाणं या सिरीजच. या सिरीज साठी आणि प्रथमेश लघाटे याच्या शिवश्रावणी या सिरीजसाठी सध्या मुग्धा आणि प्रथमेश विविध पुरातन ऐतिहासिक मंदिरांना भेट देत मंदिर, मंदिराचा परीसर शूट करत आपल्या सिरीजच्या माध्यमातून मंदिरांचा इतिहास आणि पुरातन मंदिराचा अनमोल ठेवा प्रेक्षकांसमोर आणत आहेत.
आपण देवस्थानचा अनमोल ठेवा प्रेक्षकांसमोर मांडत असताना आपल्याकडून देवाची ख्याती महती सर्वत्र पोचते हे आपलं भाग्य असून देवाची गाण्यातून गीत रुपी सेवाही घडावी यासाठी गायन केले जाते व समाप्ती केली जाते अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ओटवणे रवळनाथ मंदीर येथेही गीत गावून शूटिंगचा समारोप झाला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंदीर परिसरात उपास्थित होते. देवस्थानच्या वतीने देवस्थान प्रमुख रवींद्रनाथ गावकर यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच सावंतवाडी शहरातील भडवाडीत सुमारे ३५० वर्षांपूर्वीच्या विठ्ठल मंदिर व कोकणातील पहिल्या दत्त मंदिरात या दोघांनी भेट दिली. प्रथमेश आणि मुग्धा यांच्या घरची पार्श्वभूमीवर आध्यात्मिक आणि धार्मिक स्वरूपाची आहे. नुकतीच त्यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल कबूली दिली आहे. तर लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार असून सोशल मिडियावर ही जोडी चर्चेत आहे. सावंतवाडीत आलेल्या व मोठ्या झालेल्या लिटिल चॅम्पसोबत अनेकांनी सेल्फी व फोटो घेतले.