मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली. या बातमीनंतर अनेक चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. नुकतीच त्याच्या तब्येतीबाबत अपडेट समोर आली आहे. या अपडेटनंतर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. डॉक्टरांनी श्रेयसच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.
श्रेयस तळपदे गुरुवारी मुंबईत वेलकम टू जंगल सिनेमाचं शूटिंग करत होता. सिनेमाच्या शूटिंगनंतर तो घरी गेला. पण घरी गेल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याच्या पत्नीने त्याला लगेच अंधेरीतील बेलव्ह्यू रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्या छातीत ब्लॉक असल्याचं आढळून आलं. त्यानंतर डॉक्टरांनी लगेचच त्याची अँजिओप्लास्टी केली. त्याला हृदयविकाराचा झटका येण्याआधीच त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. त्याला आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळू शकतो.
दरम्यान, श्रेयस तळपदे त्याच्या आगामी वेलमक टू जंगल सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याने गुरुवारी सिनमातील काही अॅक्शन सीक्वेन्स शूट केले होते. संपूर्ण दिवसभर तो शूटिंग करत होता आणि त्याची प्रकृती उत्तम होती. पण शूटिंग संपल्यानंतर तो घरी आला, घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्याच्या पत्नीने लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात जाताना त्याला वाटेतच चक्कर आली होती. रात्री १० वाजताच्या सुमारास त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असून लवकरच त्याची घरी सोडण्यात येईल.