मुंबई : ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. यामध्ये चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र आणि मृणाल कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोणता अभिनेता असेल याची उत्सुकता वाढली आहे.
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आणि तेव्हापासून एकच चर्चा रंगली ती म्हणजे ‘शिवरायांचा छावा’ साकारणार कोण? या तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची चालून आलेली सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यापूर्वी ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
फक्त तरुण पिढीच नव्हे तर सर्व वयोगटातील प्रेक्षक वर्ग सध्या ऐतिहासिक सिनेमा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सिनेमागृहाकडे वळले आहेत. त्याचं कारण म्हणजे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. ‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या भव्य ऐतिहासिक सिनेमांसाठी दिग्पाल लांजेकर ओळखले जातात. पुरस्कार विजेते दिग्पाल लांजेकर आणि ‘मल्हार पिक्चर कंपनी’ यांनी आता ‘शिवरायांचा छावा’ हा आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे.