अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ या बहुचर्चित चित्रपटातील सर्वच व्यक्तिरेखा आता समोर आल्या आहेत. मनातील दुःख कधीही चेहऱ्यावर येऊ न देता स्मित हास्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महाराणी सईबाई भोसले यांची व्यक्तिरेखाही आता आपल्या समोर आली आहे. सायली संजीव हिने महाराणी सईबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे.
महाराणी सईबाई भोसले यांची भूमिका साकारण्याचा अनुभवाबद्दल सायली संजीव म्हणते, ” ही भूमिका साकारण्याचा अनुभव मी शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. ही व्यक्तिरेखा अनुभवता आली, हीच खूप मोठी गोष्ट आहे. मुळात महाराणी सईबाई भोसले यांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी संधी नव्हती, तर हा मला मान मिळाला आहे. त्यामुळे याहून जास्त मी काही बोलूच शकत नाही.”
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुबोध भावे, बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका शरद केळकर तर सोनाबाई देशपांडे यांची भूमिका अमृता खानविलकर हिने साकारली आहे. येत्या दिवाळीत म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत असून सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सची निर्मिती आहे. हा चित्रपट एकाच वेळी मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.