ब्युरो न्यूज : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळविणारे दोन स्पर्धक खऱ्या आयुष्यात जोडीदार झाले आहेत. प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाची मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. दोघांच्या ग्रहमखाचे फोटोही समोर आले होते. त्यानंतर काल (२१ डिसें.) रोजी मुग्धा व प्रथमेश यांनी लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
गायिका शमिका भिडे तसेच रोहित राऊत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. हे जोडपं लग्नाच्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. लग्नात मुग्धाने हिरव्या काठांची पिवळी नऊवारी नेसली आहे. तर, प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता व पुणेरी पगडी घातली आहे. त्याने पिवळ्या रंगाचं उपरणं घेतलं होतं. मुग्धा व प्रथमेश यांचे लग्न रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण इथे पार पडले. दरम्यान, प्रथमेश आणि मुग्धाने काही महिन्यांपूर्वी त्यांचं नातं अधिकृत केलं होतं. ‘आमचं ठरलंय’ म्हणत सोशल मीडियावर त्यांनी नात्याची कबुली दिली होती. यानंतर त्यांनी ५ नोव्हेंबरला पारंपरिक पद्धतीने साखरपुडा केला होता. आज २१ डिसेंबर रोजी ते लग्नबंधनात अडकले.