चघळलेल्या च्युईंगमचा ऑनलाईन लिलाव | बोली पाहून व्हाल थक्क !

बोली लावण्याची 31 मार्च होती अखेरची तारीख
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: April 01, 2023 09:57 AM
views 409  views

नवी दिल्ली : एक काळ असा होता की, भारताचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची गाडी जवळून गेल्यावर त्यांच्या महिला चाहत्या त्या ठिकाणची माती उचलून सिंदूर म्हणून आपल्या डोक्याला लावायच्या. देवानंद यांना काळा कोट घालण्यास बंदी घालण्यात आली होती, कारण मुली त्यांच्या प्रेमात पडायच्या आणि अनेकांनी आपल्या आवडत्या स्टार्ससाठी आत्महत्या देखील केली. तुम्हाला वाटत असेल की सुपरस्टार्सचं ते युग गेलं, आता आजच्या काळात असं होणार नाही. जर तुम्हाला खरोखर असं वाटत असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. सध्या भारतात नाही तर अमेरिकेत असा विचित्र प्रकार पाहायला मिळत आहे.


आजकाल ऑनलाइन ई-कॉमर्स साइट ई-बे वर चघळलेला च्युइंगम विकला जात आहे. होय, एक साधा च्युइंगम आणि तोही चघळलेला, तो ऑनलाइन विकला जात आहे. याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर आता थांबा. जेव्हा तुम्हाला या च्युइंगमची किंमत कळेल तेव्हा तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल. हा च्युइंगम 10-20 रुपयांना विकला जात नाही, तर 32 लाख रुपयांना विकला जात आहे!



चघळलेल्या च्युइंगमची किंमत एवढी जास्त आहे, यात विशेष काय आहे, याचा विचार करणं सहाजिक आहे! वास्तविक, ज्या व्यक्तीने ई-बेवर त्याचा लिलाव करण्याची योजना आखली आहे, त्याने दावा केला आहे की तो चघळलेला च्युइंगम हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डाउनी जूनियरचा आहे. तोच रॉबर्ट डाउनी ज्युनियर ज्याला जग 'आयर्न मॅन' म्हणून ओळखतं.


मार्वलच्या सिनेमांमध्ये आयर्न मॅनची भूमिका साकारल्यानंतर तो इतका प्रसिद्ध झाला की लोक त्याच्या चघळलेल्या च्युइंगमसाठी 32 लाख रुपये द्यायला तयार आहेत. च्युइंगमची सुरुवातीची किंमत 32 लाख रुपये होती, या लिलावाची अंतिम तारीख 31 मार्च होती आणि बोली लावण्याची वेळ संपली आहे. सध्या वेबसाइटवर त्याची किंमत ४५ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.