मुंबई : श्री गणेशाच्या भक्तीरसाने चिंब झालेले अलौकीक शब्द, संगीतातला ध्रुवतारा आणि कोकणचा सुपुत्र राजयोग धुरी याचा दैवी स्वर, आणि या सुर-तालावर थिरकरणारी मानसीची पावलं, अशी मनोहारी अनुभूती देणा-या नव्या गणेशगीताचं रसिकांनी उत्स्फुर्त स्वागत केलं. गेले अनेक दिवस आतुरता लागून राहिलेलं हे गाणं सोमवारी झी मराठी वाहिनीनं रिलीज केलं. अतिशय मंत्रमुग्ध करणारे स्वर आणि ताल धरायला लावणारं नृत्य यामुळं अवघ्या रसिकांमधुन या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
कोकणचा सुपुत्र असलेला राजयोग आपल्या कुटूंबातला संगीताचा वारसा मोठया समर्थपणे पुढं चालवत आहे. वयाच्या बाराव्या वर्षीपासुन तो पंडीत अजित कडकडे यांच्याकडं गायनाचे धडे घेत आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या 'मी होणार सुपरस्टार' या शोमध्ये ख-या अर्थानं राजयोगला व्यासपीठ मिळालं. याच व्यासपीठावरून त्यानं आपल्या वर्सेटाईल गायकीची झलक दाखवली आणि भरभरून दादही मिळवली. याच शोपासुन त्याला छोटे उस्ताद आणि ध्रुवतारा असे मानाचे किताब मिळाले.
या यशानंतर मोरेश्वर प्रसन्न प्रॉडक्शन हाऊसनं राजयोगच्या आवाजात एक गणेशगीत यंदाच्या चतुर्थीत लॉंच करण्याचा निर्णय घेतला. राजयोगचे आजोबा ठिकसेन बांदकर यांचं अतिशय भक्तीपूर्ण असं हे गीत अतिशय कौशल्यानं कंपोज करण्यात आलं. त्यानंतर ते चित्रीतही करण्यात आलं. प्रसिध्द नृत्यांगणा आणि अभिनेत्री मानसी नाईकसोबत यात प्रथमच राजयोगनं सुंदर अभिनय केलाय. अतिशय समर्पक लोकेशन, नृत्य आणि सुरेल साज लाभलेल्या या गाण्याला रिलीज झाल्यावर पहिल्याच दिवशी रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोशल मिडीयावरही या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.