वैद्यकीय क्षेत्र उपजीविका, शब्द ही माझी जीविका : डॉ. अनुजा जोशी

Edited by:
Published on: May 18, 2024 14:15 PM
views 218  views

'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा..!


कवयित्री डॉ. अनुजा जोशी

पुष्प -३० वं


कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनल कोकणसाद LIVE च्या 'जागर' 'कोकणच्या साहित्य रत्नांचा', या सदराच्या ३० व्या पुष्पात कवयित्री, लेखिका डॉ. अनुजा जोशी यांना. कविता, ललित लेख, कथा, गीतलेखन, संगीतिका, बालकविता, बालकथा, लेख, समीक्षात्मक लेखन, वैद्यकीय लेखन त्यांनी केलं आहे. सध्या गोव्यात त्या आयुर्वेदिक वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. जागर कोकणच्या साहित्यरत्नांच्या ३० व्या पुष्पात दैनिक कोकणसादचे प्रतिनिधी विनायक गांवस यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.


*मुलाखत*

पुष्प : ३० वं.


*वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना साहित्याकडे कशा वळला ?*

साहित्य मला रक्तवंशान मिळालं. माझे वडील शरद काळे हे सिंधुदुर्गतील एक ज्येष्ठ साहित्यिक होते. वि. स. खांडेकर यांचे ते छात्र लेखनिक होते‌. डॉ . द.भि. कुलकर्णी यांचे ते विद्यार्थी होते. सत्यकथा, मौज सारख्या नियतकालिकांचे ते ललित लेखक होते. त्यामुळे लेखनाचा वारसा वडीलांकडूनच आला होता. मुख्याध्यापक पदाची जबाबदारी त्यांच्यावर आल्यानंतर पदाला न्याय देता यावा म्हणून त्यांनी लेखन थांबवले होते. आई तेथील संस्थेच्या मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह सांभाळत होती. दोघांनी ग्रामिण भागात धैय्यवादी पद्धतीने शाळा व संस्था चालवली होती. या व्यापात वडील राहील्यान त्यांच्या थांबलेल्या अकाली लेखन प्रवासापासून माझा लेखन प्रवास सुरू होतो. तशा नाट्यमय घडामोडी माझ्या जीवनात घडल्या आहेत. वडीलांनी सेवानिवृत्तीनंतर कथेत एक कथानाय रंगवला होता‌. लेखन थांबल्यान तो निराश होता.  अशातच त्याला मुलीचं पत्र येत की कथेला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला‌.‌ तेव्हा त्याला वाटतं की आपली निराशा व्यर्थ आहे. आपलं लेखन मुलीच्या रूपानं सुरू आहे. तिच्या रूपानं आपणच लिहीत असल्याचा आभाळ आनंद होतो. ही कथा वाचून वडीलांना हा आभाळ आनंद देता यावा यासाठी आपल्याला देखील लिहायला हवं या भावनेतून मी लिहू लागले.


*कवीता, साहित्य लेखनाचा पहिला अनुभव कसा होता ?*

शाळेत विविध उपक्रम असायचे. सहावीत असताना डोंगरावर बसून गावावरची पहिली कविता मी लिहीली होती. तिथपासून लेखनाला सुरुवात झाली होती. आईचं सामाजिक काम पहात होते. त्यातून प्रेरणा मिळाली. लग्नानंतर गोव्यात गेल्यावर वैद्यकीय सेवा दिली. स्त्रीच्या जबाबदाऱ्या देखील होत्या. थांबलेल्या लेखकाची मी कन्या होते. या संघर्षातून पुढे जाताना स्त्रीच्या जाणीवांची कविता मी लिहायला सुरुवात केली. 

  

*वैद्यकीय क्षेत्र आणि साहित्य हा ताळमेळ कसा साधलात ?*

बी.एम.एस सावंतवाडीला आयुर्वेद कॉलेजला पूर्ण केलं. त्यानंतर लग्न झालं. मला स्त्रीरोग तज्ञ व्हायचं होतं. पण, ते काही कारणांमुळे शक्य झालं नाही. अशावेळी स्त्रीरोग तज्ञ होता न आल्यानं स्त्री आरोग्य तज्ञ मी झाले. केवळ औषधांचे उपचार हे अपुरे आहेत. त्यामुळे रूग्णांच मन जाणून घ्यावं असं मला वाटू लागलं. याच गोष्टी हळूहळू लेखनात उतरत गेल्या. सगळ्या व्यापातून सायंकाळी वेळ मिळायचा तेव्हा लेखनास वेळ दिला. 'वैद्यकीय क्षेत्र ही माझी उपजीविका अन् शब्द ही माझी जीविका'अस मी मानते. स्त्री संघर्षाचा, सोसण्याचा, बाईपणाच्या वेदनांचा उत्सव हा पहिला कवितासंग्रह मी लिहीला. त्यानंतर 'उन्हाचे घुमट खांद्यावर' हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. माणूसपणाची वाट यातून मांडली आहे.


*तुम्ही लिहिलेली अन् तुम्हाला भावलेली कविता कोणती ?*

''कविता सांगत नाही काही स्पष्टपणे, ती दाखवते फक्त जगण्याच्या शक्यता ठासून भरलेल्या. तिचे हात घेऊन ज्यानं त्यानं उचलायच एकएक ओझं आपापल्या कुवतीप्रमाणे.'' कविता ही जगण्याची शक्यता दाखविणारी चिज आहे. शांतसुखाल लिहिण्याच साधन म्हणजे कविता नव्हे. माझ्या दृष्टीने जगण्याच्या शक्यता दाखवणार कविता हे मुल्य आहे.


*आरोग्य क्षेत्राकडे साहित्यिकाच्या नजरेतून कसं पहाता ?*

आयुर्वेद साहित्यात अन् साहित्यिक भूमिका आरोग्यात कशी परिपोषक आहे हे हळूहळू कळू लागलं आहे‌. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर जसा देवदूत असतो तसं तो यमदूत पण होऊ शकतो. दोन्ही उदाहरण आपल्यापुढे आहेत. मी सच्चाईन, प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली. २८ वर्ष गोव्यातील डोंगराळ भागात असणाऱ्या सत्तरी तालुक्यात सेवा देत आहे. पैसा, लौकिक यापेक्षा माणूस म्हणून याठिकाणी करावं लागतं. काही अनिष्ट प्रकारांना ना म्हणाव लागत. अनेक गैरव्यवहार येथीही आहेत. आतल्या आवाजाला, ईमानदारीला महत्व द्यावे लागत. बाह्यभुमिकेला बळी पडू देत नाही. साहित्यातही गट आहेत. कविता खूप बदलली आहे. लहानपणी चालीत कविता म्हणायचो. आताची कविता गद्यप्राय झाली. लयीत कविता लिहित असाल तर आजकाल मागच्या जमान्यात आहात असं मानलं जातं. मुक्त छंदात लिहीत असाल तर समकालाशी जोडून घेत आहेत असं दिसतं आहे. पण, मला असं वाटतं नाही. माझा सच्चा आवाज मी जपत आहे. माझी भूमिका ही सुवर्णमध्य काढणारी नेहमी असते. आयुर्वेदामुळे ही भूमिका मला मिळाली. 


*'मुलगी, आई आणि आजी' या आपल्या कार्यक्रमा विषयी जाणून घ्यायला आवडेल?* 

स्त्री जात यामध्ये येते, विविध भावावस्ता यात असतात‌. बर्फी, पेढा, मासिक पाळी, लग्न आदींबाबतच मार्गदर्शन कवितेच्या माध्यमातून करते‌. स्त्रीयांना ते आवडत. ते त्याच पालन करतात. काहीजणी वाचनाकडे, साहित्याकडे वळतात. त्यावेळी एक समाधान प्राप्त होत. डॉक्टर आणि लेखक म्हणून मी समाधानी असते‌.


*आपल्या 'रामाणी' या समीक्षा लेखना विषयी काय सांगाल ?*

कोकणातून मी गोव्यात गेले‌. मराठी, कोकणी भाषावाद थोडा आहे. भाषावादान वाड्मयीन हानी होणार वातावरण आहे‌‌. लाल माती, हिरवी झाडी, निळ पाणी हे एक आहे‌. गोयकांर पणापेक्षा भूयकांरपणाला अधिक महत्त्व देते. जन्मभूमी कोकण आहे, कर्मभूमी गोवा आहे‌ मात्र लालमाती एक आहे‌. म्हणून स्वःताला मी लाल मातीची लेक मानते. बोरकर, रामाणी, विंदा, आरती प्रभू, कुसुमाग्रज ही माझ्या वडीलांची श्रद्धास्थानं. वि.स. खांडेकरांचे तर ते छात्र लेखनिक होते. शंकर रामाणी यांनी बोरकरांनंतर गोमंतकीय मराठी कवितेचा वारसा पुढे चालवला. जन्मशताब्दी वर्षांपर्यंत म्हणाव तसं त्यांच्याविषयी काम झालं नव्हतं, पुस्तकही उपलब्ध नव्हती. अशावेळी शंकर रामाणी यांच्यावर समीक्षात्मक लेखन केलं. मराठीकडून त्यांची उपेक्षा झाली होती. त्यामुळे समग्र रामाणी यावेत ही इच्छा होती. त्यांचे कुटुंबीय व इतरांच्या मदतीने रामाणी यांच्या कवितेचा अभ्यास म्हणून हे लेखन केलं. 


*गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, मराठीविषयक कार्यात आपण सक्रिय सहभागी आहात. काय सांगाल या कार्याबद्दल ?*

मराठीचा समृद्ध वारसा गोव्यात आहे. खुप मोठी समृद्ध परंपरा साहित्यात गोव्यात आहे‌. बृहन्महाराष्ट्राचा छोटासा भाग म्हणून तो बाजूला राहतो. मराठीच्या मुख्य धारेशी तो जोडला जात नाही. गोव्यातली प्रतिभा महाराष्ट्राच्या मुख्य धारेशी जोडली जावी यासाठी मी प्रयत्नशील असते. मराठीच वेगळं योगदान यापुढे घेतलं जाईल असं वाटतं. 


*भविष्यातील लेखना विषयी काय सांगाल ?*

मराठी, कोकणी दोन्ही साहित्य विश्वांचा सहवास लाभला. प्रत्येकाकडून चांगलं घेण्याचा प्रयत्न केला. मी राहते तो सत्तरी तालुका अभयारण्यच आहे. समृद्ध वनसंपदा तेथे आहे. तिथल्या लोकांशी माझं नातं आहे‌. दोतर अनुजाबाय म्हणून मायेनं तिथली लोकं हाक मारतात. समृद्ध व छान वातावरण तिथं आहे‌. ओला दुष्काळ असल्यासारखी परिस्थिती कधीतरी जाणवते‌. महाराष्ट्रासारखा संघर्ष साहित्याच्याबाबतीत तिथे नाही. तिसरा काव्यसंग्रह हा 'मोरनी' नावाचा आहे. सत्तरीतील पक्षी यात आहेत. स्त्री-पुरुष नातेसंबंध यातून आलं आहे‌. स्त्रीविषयक वेगळ्या प्रतिमा यातून मांडल्या आहेत.


*नव्या पिढीला साहित्यिक अधिक डॉक्टर म्हणून कोणता संदेश द्याल ?*

संतुलन असावं, एखाद्या विचारधारेशी बांधून घेऊ नये. पुरस्कार, मानसन्मानास लेखक बळी पडतो. मोठा पुरस्कार मिळाला म्हणजे लेखकाला महत्व असं बोललं जात‌. नवोदित लेखकांनी आपली वाट सच्चाईन चोखाळावी. एखाद्या प्रवाहाला बांधून न घेता आतल्या आवाजाशी प्रामाणिक राहून लेखन करावं. ईमानदारी व सच्चाई हा गाभा रहावा. 


छाया : प्रसाद कदम 

शब्दांकन: विनायक गांवस