बचत गटांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणार : नितेश राणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 26, 2025 19:27 PM
views 14  views

वैभववाडी :  “जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांना केवळ राज्यातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी केले. 

वैभववाडी येथे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानांतर्गत आयोजित  महिला संमेलनात ते बोलत होते.या कार्यक्रमाला भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, अरविंद रावराणे, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, माजी सभापती जयेंद्र रावराणे, दिगंबर पाटील, भाजपा महिला अध्यक्षा प्राची तावडे, तसेच सीमा नानिवडेकर, शारदा कांबळे, वैशाली रावराणे, स्नेहलता चोरगे, अनुज्ञा अंगवलकर, नेहा माईणकर, संगीता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील दहा वर्षांत घेतलेले निर्णय महिलांना आत्मनिर्भर्तेकडे घेऊन जाणारे आहेत. ‘लखपती दीदी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ यांसारख्या उपक्रमांमुळे प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी आली आहे. महिलांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हेच पुढील लक्ष्य आहे. मंत्रालयात लवकरच बचत गटांच्या उत्पादनांसाठी खाद्य महोत्सव भरविण्यात येणार असून, जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.त्यानुसार पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्गचा समावेश होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राणे पुढे म्हणाले की, “सध्या जिल्ह्यात बचत गटांच्या माध्यमातून सुमारे ५५ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. महिलांनी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे. आत्मनिर्भर महिला म्हणजे आत्मनिर्भर कुटुंब, आणि आत्मनिर्भर देश.” तसेच ते पुढे म्हणाले,“महिला सक्षमीकरणाच्या योजना राबवणारे नेतृत्व सत्तेत राहिले पाहिजे. या योजना थांबू नयेत यासाठी मोदी आणि फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवावा असं आवाहन केलं.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड म्हणाल्या, “प्रत्येक जिल्ह्यातून एक लाख उद्योजिका तयार झाल्या पाहिजेत. महिलांनी नव्या संधी शोधाव्यात, नवीन गट तयार करून इतरांना हातभार लावावा.”भाजपा महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे म्हणाल्या, “महिला सक्षम झाल्या तर समाज आणि कुटुंब सक्षम होईल. आत्मनिर्भर भारत अभियान हे शेवटच्या घटकातील व्यक्तीला आर्थिक स्थैर्य देणारे आहे.” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची तावडे यांनी केले, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शारदा कांबळे यांनी केले.