
अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कांतारा: चॅप्टर १' नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पॅन-इंडिया स्तरावर दैवी आणि ऐतिहासिक कथा प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची ऋषभ शेट्टी यांची क्षमता आता सिद्ध झाली आहे. 'कांतारा' च्या यशाच्या लाटेवर स्वार होत असतानाच, ऋषभ शेट्टी लवकरच एका भव्य ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, जो प्रत्येक मराठी आणि भारतीय प्रेक्षकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
ऋषभ शेट्टी यांनी आपला पुढील 'मॅग्नम ओपस' चित्रपट 'द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' (The Pride of Bharat: Chhatrapati Shivaji Maharaj) याची घोषणा केली आहे. या चित्रपटात ते स्वतः महाराष्ट्राचे महान योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. ३ डिसेंबर २०२४ ला या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते.
'कांतारा चॅप्टर १' मध्ये ऋषभ शेट्टी यांनी साकारलेला 'देव' आणि 'माणूस' यांच्यातील संघर्ष आणि त्यांच्या अभिनयाची तीव्रता पाहून, ते आता छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वाला मोठ्या पडद्यावर कसा न्याय देतात, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'कांतारा'ने प्रेक्षकांना कर्नाटकातील एका विशिष्ट लोककथेचा अनुभव दिला. आता 'द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' च्या माध्यमातून ऋषभ शेट्टी मराठा साम्राज्याच्या संस्थापकाची शौर्यगाथा घेऊन येणार आहेत. त्यांच्या अभिनयातील वेगळी आणि दमदार शैली पाहता, हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.