देशातील सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा आज 56 वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले ड्रेस परिधान करतात. बॉलिवूड कलाकारांचा हा सर्वाधिक आवडता डिझायनर आहे. मोठमोठ्या रँप वॉकमध्ये, रेड कार्पेट तसेच कलाकारांच्या लग्न समारंभामध्ये देखील बॉलिवूड कलाकारांची पहिली पसंत मनीष मल्होत्रा आहे. आजच्या काळात मनीष मल्होत्राकडे प्रचंड पैसा, संपत्ती आहे. मात्र, त्याच्या आयुष्यातील एक काळ असा होता ज्यावेळी त्याचा पगार फक्त 500 रुपये होता.
एका मुलाखतीत मनीष मल्होत्राने स्वतः आपल्या करिअरचा प्रवास सांगितला होता. त्यावेळी तो म्हणाला होता की, तो लहानपणापासून पंजाबमध्ये वाढला. त्याला जे काही करायचे होते त्यासाठी त्याच्या आईने त्याला साथ दिली. अभ्यासाच्या बाबतीत तो थोडा कमी होता. बॉलिवूडसाठी आपलं प्रेम व्यक्त करत त्याने सांगितलं की, त्याला चित्रपट पाहण्याची खूप आवड होती. तो प्रत्येक चित्रपट आवर्जून पाहतो. तसेच सहावीमध्ये असताना त्याने चित्रकलेचा क्लास लावला होता. त्यावेळी त्याला कलर आणि आर्टसंबंधित गोष्टी त्याला आवडू लागल्या. यातून हळूहळू त्याला कपड्यांना फॅशन करणं आवडू लागलं.
पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर त्याने मॉडलिंगसोबत एका बुटिकमध्ये काम करायला सुरुवात केली. याठिकाणी तो डिझाइनच्या विविध पद्धती शिकला. त्यावेळी त्याला दर महिन्याला 500 रुपये पगार दिला जायचा. हळूहळू त्याने आपल्या कामामध्ये खूप मेहनत घेतली. वयाच्या 25 व्या वर्षी त्याला बॉलिवूडमधील पहिली संधी मिळाली. अभिनेत्री जुही चावलाच्या एका चित्रपटातील ड्रेस डिझाइन करण्याची त्याला संधी मिळाली. त्यानंतर त्यासाठी त्याला फिल्मफेअर अवॉर्ड देखील देण्यात आला. 2005 मध्ये मनीष मल्होत्राने आपलं लेबल लाँच केलं.