कणकवली : कणकवली पर्यटन महोत्सवात काल रात्री उशिरापर्यंत ‘कॉमेडी शो विथ ऑर्केस्ट्रा’ ने धमाल आणली. तर आज रात्री आठ वाजता स्थानिक कलावंतांच्या सहभाग असलेला बहारदार ‘कनकसंध्या’ हा कलाविष्कार सादर होणार आहे. तत्पूर्वी चिमुकल्यांचा ‘किड्स’ शो होईल. तर रात्री दहा वाजता सेलिब्रेटी कलाकारांचा जल्लोष आणि नृत्य-गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
हजारो रसिकांची गर्दी होत असलेला कणकवली पर्यटन महोत्सवात उत्तरोतर रंगत आहे. यात आज रात्री अाठ वाजता दिग्दर्शक सुहास वरूणकर, लोककलावंत हरिभाऊ भिसे आणि संजय मालंडकर यांच्या संकल्पनेतून स्थानिक कलाकारांचा कनकसंध्या हा कलाविष्कार सादर होणार आहे. या कलाविष्कारामध्ये नांदी, बातवणी, धनगरी नृत्य, वाघ्या मुरळी, विठ्ठल दिंडी, शेतकरी नृत्य, पाश्चात्य नृत्य, लावणी, कोळी नृत्य, गोंधळ आदींचे धमाल सादरीकरण होणार आहे.
भाई साटम आणि त्यांचे ५० सहकारी ‘मनी आहे भाव.. देवा मला पाव’ हा अध्यात्मिक आणि विनोदी कार्यक्रम सादर करणार आहेत. तर रात्री दहा वाजता सेलिब्रेटी कलाकारांचा जल्लोष हा नृत्य व गायनचा कार्यक्रम होईल. यामध्ये विख्यात गायिका वैशाली माडे, स्वप्नील गोडबोले, इंडियन आयडॉल फेम सायली कांबळे यांच्यासाेबत हेमलता बाणे, लावणी सम्राज्ञी विजया कदम यांचे बहारदार नृत्य होणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी करणार आहेत.