सावंतवाडी : कुडाळ येथील हेल्प ग्रुपच्यावतीने ७ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या दहीहंडी रिल्स कॉम्पिटिशन या स्पर्धेमध्ये बांदा येथील गौरी बांदेकर रिल्स ग्रुपने द्वितीय क्रमांकावर आपले शिक्कामोर्तब केले. या रिल्स मधून गौरी बांदेकर, गजेंद्र कोठावळे, भारती परब आणि अवंती पंडित या कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
रिझल्टच्यावेळी मोठ्या स्क्रीनवर जेव्हा हा व्हिडिओ दाखविला गेला तेव्हा त्यातील प्रत्येक मुद्द्यासाठी ऑडिअन्स मधून भरघोस टाळ्यांचा प्रतिसाद लाभला. रिल्स म्हटले की त्यामध्ये खास करुन तरुण मुलांची मक्तेदारी जास्त असते. पण गौरी बांदेकर यांचा ग्रृप कोकणातील मध्यमवयीन महिलांना आपल्या रिल्समध्ये स्थान देऊन जनमानसात एक आगळावेगळा ठसा उमटवित आहे. अनेक सामाजिक ,राजकीय आणि चर्चात्मक विषय गौरी बांदेकर यांचा रिल्स ग्रृप आपल्या विनोदी शैलीतून सक्षमपणे प्रेक्षकांसमोर मांडत असतो. आणि त्यांना देश विदेशांमधून सुद्धा मराठी लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अस्सल मालवणी भाषेतून तयार केलेले हे रील्स हसता हसता लोकांना विचारही करायला भाग पाडतात. लोक सुद्धा त्यांच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. आपले समस्त कलाकार आणि आपल्यावर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक तसेच बांदा गावचे समस्त ग्रामस्थ ,मित्रपरिवार या सर्वांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत असे या ग्रुपचे मत आहे.त्यांच्या या यशासाठी त्यांना विविध स्तरातून गौरविले जात आहे.