पणजी : राज्यात कायमचा मुक्काम असलेल्या ५४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) सोमवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी देश-विदेशांतील हजारो चित्रपटप्रेमी राजधानी पणजीत दाखल झाले आहेत. ब्रिटनच्या ‘कॅचिंग डस्ट’ या चित्रपटाने इफ्फीचा पडदा उघडणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री माधुरी दीक्षितसह अभिनेता शाहीद कपूर, अभिनेत्री श्रेया सरन यांच्यासह अन्य बॉलीवूड कलाकार उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या उद्घाटन सोहळ्यात करमणुकीच्या कार्यक्रमांवर अधिक भर देण्यात येणार आहे. या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण कोकणसाद LIVEच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
महोत्सवात होणाऱ्या विविध मास्टर क्लास व इन कॉन्व्हर्सेशनमध्ये विद्या बालन, राणी मुखर्जी, सारा अली खान, मनोज वाजपेयी, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दिकी असे बॉलिवूडचे दिग्गज कलाकार येणार आहेत. याशिवाय सनी देओल, मधुर भांडारकर, के. के. मेनन, विजय सेतुपती, बोनी कपूर, गुलशन ग्रोवर, करण जोहर, अल्लू अर्जुन, कार्तिकी गोन्साल्वीस यांच्यासह मायकल डग्लस, ब्रिलांटे मेंडोझा, ब्रेंडन गाल्विन हे विदेशी कलाकारही उपस्थित राहणार आहेत.
यंदाही मिरामार, रवींद्र भवन मडगाव आणि हणजूण येथे ओपन एअर स्क्रीनिंग दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, महोत्सवासाठी देश-विदेशातील सुमारे सात हजार प्रतिनिधींनी नोंदणी केलेली आहे.
महात्सवाचे उद्घाटन आणि समारोप सोहळा ताळगाव येथील डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे. या व्यतिरिक्त आयनॉक्स, मॅकेनीझ पॅलेस आणि पर्वरी येथील आयनॉक्समध्ये चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या शिवाय कला अकादमीत मास्टरक्लास होणार आहे, तर मिरामार समुद्रकिनारी, हणजूण येथे समुद्रकिनारी व मडगावच्या रवींद्र भवन येथे खुला पडदा लावण्यात येणार आहे. भगवान महावीर बालोद्यान तसेच कला उद्यान येथे मनोरंजन झोन करण्यात आला आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत.
सुरक्षा तसेच आपत्कालीन सेवेसाठी गोवा पोलीस, अग्निशामक दल आणि १०८ जीव्हीके इएमआरआय रुग्णवाहिका व इतर यंत्रणा सज्ज झाली आहे.