गौतमीनं दिली प्रेमाची कबुली !

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 23, 2023 19:01 PM
views 214  views

मुंबई : अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गौतमीने तिची मोठी बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीत दमदार अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या गौतमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर गौतमीने जोडीदाराबरोबरचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून गौतमी देशपांडे अभिनेता-इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर दोघांनीही इन्स्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर करत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आता लवकरच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. आज त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला.गौतमीची मोठी बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने शेअर केलेल्या एका कौटुंबिक फोटोमुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना सुरुवात झाली होती. याशिवाय मृण्मयीने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये #SwaG हॅशटॅग वापरल्यामुळे स्वानंद-गौतमी लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर दोघांनीही अधिकृतपणे आपल्या नात्याची कबुली दिली आहे.

गौतमीने लग्नमंडपातील काही रोमँटिक फोटो शेअर करत त्याला “यंदा सिक्रेट सांताचं आगमन लवकर झालंय…नवी सुरुवात” असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, मराठी कलाकारांसह नेटकरी सध्या या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.